सातारा : भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करुन छगन भुजबळांवर कारवाई करत आहे. मात्र याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही, असं पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले.
जर या प्रकरणात छगन भुजळांनी चूक केली असेल तर त्यांना ती भोगावीच लागेल पण यात भुजबळ निर्दोष असले तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असं म्हणत पवारांनी सेना-भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज ५७ वी पुण्यतिथी. या निमीत्ताने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाऊराव पाटलांच्या समाधीच दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामाचं कौतुक केलं.
यावेळी शरद पवारांसोबत खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील आणि पतंगराव कदम हे नेते देखील उपस्थित होते. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान राज्यभरातील रयतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पवारांच्या भाषणातील मुद्दे
1) छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेमागे सत्तेचा गैर वापर असून, भुजबळ यांच्या अटकेमुळे पक्षावर कोणताही परिणान होणार नाही. चूक केलेली नसेल तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल आणि चूक केलेली असेल तर भुजबळांना भोगावी लागेल.
2) वेगळ्या विदर्भाची गरज नसून तेथील जनतेची ही मागणी नाही. ही मागणी नेत्यांची मागणी आहे, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे.
3) मुख्यमंत्री हा संपूर्ण महाराष्ट्राचा असतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानासमोर फक्त विदर्भ-मराठवाडयाची दुष्काळी परिस्थिती मांडली वास्तविक पश्चिम महाराष्ट्रातही दुष्काळाची भीषणता आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
4) नितीश कुमार यांनी बिहारमध्ये अत्यंत चांगले काम केले आहे, त्यांनी नेतृत्व करावे हे माझे व्यक्तीगत मत आहे या बाबत माझं इतर घटक पक्षांशी बोलणे झालं नाही..
5) केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसामसह ५ राज्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे मोदी फॅक्टर चालणार नाही. या सर्व राज्यात स्थानिक पक्षांना यश मिळेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.