मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. त्या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर शासकीय यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घालून गैरसमज दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
कोपर्डी प्रकरणी निघणारे मोर्चे आणि आयसिस संशयित समजून मुस्लिम तरुणांवर होणारी कारवाई अशा विविध मुद्दयांवर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
"माझं एवढंच म्हणणं आहे कोणत्याही कायद्याचा गैरवापर करु नये आणि होत असेल तर सरकारी यंत्रणेनं त्याचा विचार करावा. अॅट्रॉसिटीबाबत माझं विधान गैरपद्धतीने दाखवलं", असं शरद पवार म्हणाले.
अनेक प्रकरणात स्थानिक राजकीय वादातून अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवले जातात. त्यामुळे कायद्याची योग्य अंमलबजावणी होते आहे की नाही, याची जबाबदारी प्रशासनानं पार पाडावी, असं पवार म्हणाले.
याशिवाय कोपर्डी प्रकरणी निघणारे मोर्चांची सरकारनं दखल घ्यावी, असं आवाहनही पवारांनी केलं.
"महाराष्ट्रातील अनेक मोर्चात लाखो लोग सहभागी झालेत, त्यामुळं मी एवढंच म्हटलं होतं की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटत असेल, तर त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला हवं. माझ्या माहितीनुसार दोन मागण्या होत्या एक मराठा समाजाला आरक्षण आणि दुसऱ्या अॅट्रॉसिटी बाबात होती. पण मी अॅट्रॉसिटी रद्द व्हावा असं म्हटलं नाही" असं शरद पवार म्हणाले.
अॅट्रॉसिटीनंतर पवारांनी आयसिस संशय़ित म्हणून सुरु असणाऱ्या कारवायांवर बोट ठेवलं. संशयित म्हणून कुणालाही तुरुंगात टाकणं, चुकीचं असल्याचा आरोप पवारांनी केला.
आर्थिक मागास मराठा मुस्लिमांना आरक्षण मिळावं
राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचीही मागणी होत आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण मिळावं ही राष्ट्रवादीची पूर्वीपासूनची भूमिका आहे. मात्र हे आरक्षण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मिळावं, असंही पवारांनी नमूद केलं.
पवारांच्या भाषणातील मुद्दे
आयसिस इस्लामविरोधी, मुस्लिम संघटनांकडूनही आयसिसचा विरोध - शरद पवार
मराठवाड्यात मुस्लीम तरुणांवर सरसकट सुरु असलेली कारवाई चुकीची - शरद पवार
कुठल्याही कायद्याचा गैरवापर कुणीही करु नये - शरद पवार
कोपर्डी प्रकरणी निघणाऱ्या मोर्चांची दखल घेतली जावी - शरद पवार
कायद्याचा गैरवापर होत असल्यास संबंधित यंत्रणांनी त्याकडे लक्ष द्यावं - शरद पवार
अॅट्रॉसिटीचा गैरवापर होऊ नये, ही आमची भूमिका - शरद पवार
अॅट्रॉसिटीच्या गैरवापरावर प्रशासनानं लक्ष घालावं - शरद पवार
गुन्हेगारांना जात-धर्म नसतो, तो गुन्हेगारच असतो - शरद पवार
सवर्णच दलितांचा वापर करुन अॅट्रॉसिटीचा गैरवापर करतात, असेही माझ्या निदर्शनास आलंय - शरद पवार
दलितांकडून अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत नाही - शरद पवार