वीजेच्या खांबावर मृतदेह 5 तास लटकून, महावितरणचा भोंगळ कारभार
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2016 06:22 AM (IST)
लातुर : औसा शहराजवळ विजेच्या खांबावर काम करायला गेलेल्या खासगी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. काशीनाथ स्वामी असं या कर्मचाऱ्याचं नाव असून काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्यामुळे काशीनाथला झटका बसल्याचं कळतंय. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काशीनाथचा मृतदेह जवळपास 5 तास खांबावर पडून होता. पण काशीनाथ हा महावितरणचा अधिकृत कर्मचारी नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवण्याची साधी तसदीही घेतली. अखेर गावकऱ्यांनीच हा मृतदेह खाली उतरवला. काशीनाथ हा सुधाकर गायकवाड या कर्मचाऱ्याकडे कामाला होता. काशीनाथला प्रत्येक दिवसाचे 150 रुपये मिळायचे. अपघाताच्यावेळीही काशीनाथ खांबावर चढला होता आणि गायकवाड खाली उभे होते....आणि याच वेळी हा दुर्देवी प्रकार घडल्याचं कळतंय. दरम्यान, काल झालेल्या या दुर्दैवी अपघातानंतर, काशीनाथच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झाले नाही. आधी न्याय द्या, मगच पोस्टमार्टम करा अशी मागणी गुलखेड़ा गावातील नागरिक करत आहेत.