Sharad Pawar NCP :  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. त्यानुसार, आता राजकीय पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) आणि  महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) अशी थेट लढत असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आता जागा वाटपाबाबत दावा करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar Faction) गटाने मुंबईतील सहापैकी एका जागेवर दावा केला आहे. शरद पवार गटाने ईशान्य मुंबईच्या जागेवर दावा ठोकला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी 6 जागा या मुंबईत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने या सहाही जागांवर आपल्या विजयाचा झेंडा रोवला. यात शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी तीन-तीन जागांवर विजय मिळवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर आता राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणांवरही परिणाम झाला आहे. त्यानंतर आता जागावाटपावर ही याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. 


शरद पवार गटाचा प्रस्ताव काय?


महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत दावा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ईशान्य मुंबई लोकसभा जागेवर दावा केला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राखी जाधव किंवा धनंजय पिसाळ यांना उमेदवारी देण्याच्या तयारी असल्याचे म्हटले जात आहे. 


मुंबईतल्या सहा जागांपैकी दोन जागा काँग्रेसने लढवावी, एक जागा राष्ट्रवादी आणि तीन जागा उद्धव गटांना लढाव्यात अशी पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


2019 चा मुंबईतून कोण लोकसभेवर?


2019 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे, उत्तर-पश्चिम मतदारसंघातून   गजानन कीर्तीकर हे विजयी झाले होते. यातील फक्त अरविंद सावंत हे  उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. तर, भाजपकडून उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबई मनोज कोटक आणि मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातून पूनम महाजन विजयी झाले होते. 


शरद पवार गटाकडून तयारी सुरू 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राज्यातील 12 लोकसभा मतदारसंघासाठीची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय, विधानसभेच्या जवळपास 58 मतदार संघातील उमेदवारांची निश्चिती शरद पवार गटाकडून करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


मविआसोबत आणखी कोणते पक्ष?


महाविकास आघाडीसोबत डाव्या-प्रागतिक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप आदी पक्ष आहेत. तर,  वंचित बहुजन आघाडीची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे. त्यामुळे जागा वाटप करताना या पक्षांनादेखील विचारात घ्यावे लागणार आहे. या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत. त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप 16-16-16 असा होतो की आणखी काही फॉर्म्युला ठरतोय, हे लवकरच समजेल.