NCP Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशव्यापी पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाकडून लोकसभा आणि विधानसभांसाठीची तयारी सुरू झाली आहे. शरद पवार गटाने लोकसभा जागांसाठीची तयारी सुरू केली आहे.
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत 12 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय, खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी जो दावा केला होता तो शरद पवार गटाकडून खोडून काढण्यात आला आहे. अमोल कोल्हे यांनी आमच्या इथे सुद्धा प्रतिज्ञापत्र भरल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. विधानसभेच्या जवळपास 58 मतदार संघातील उमेदवारांची निश्चिती शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
मविआसोबत आणखी कोणते पक्ष?
महाविकास आघाडीसोबत डाव्या-प्रागतिक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप आदी पक्ष आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे. त्यामुळे जागा वाटप करताना या पक्षांनादेखील विचारात घ्यावे लागणार आहे. या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत. त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप 16-16-16 असा होतो की आणखी काही फॉर्म्युला ठरतोय, हे लवकरच समजेल.