कोल्हापूर : राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका सरकारने घेतली, तर मराठा, धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकते, असं म्हणत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयी भक्कम बाजू मांडण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अस्वस्थतेचं वातावरण आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापुरात शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी निशाणा साधला आहे.
आजच्या युती सरकारने धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर दिलेल्या वेळेत आश्वासन पूर्ण केली नाहीत, त्यामुळे आज मराठा समाज आक्रमक झाला असल्याचंही शरद पवार म्हणालेत.
आरक्षणाचा निर्णय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच सरकार असताना निर्णय घेतला होता. त्या काळात सरकारी भरतीमध्ये 16 टक्के जागा भरल्या गेल्या. या निर्णयाविरोधात काही व्यक्ती कोर्टात गेल्या आणि निर्णय रद्दबातल ठरवला असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं आश्वासन न पाळल्यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली आणि नंतर ठिणगी पडली. त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील आंदोलने भडकली असा घणाघातही शरद पवारांनी केला आहे. वारीत साप सोडल्याच विधान नेत्यांनी केल्याने मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले. मुख्यमंत्री आणि कोल्हापूरच्या पालकमंत्र्याच्या विधानांनी आगीत तेल ओतण्याचे काम केलं म्हणून राज्यात मराठा समाजाची आंदोलने भडकली असा आरोपही शरद पवारांनी केला आहे.
राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सोडवावा अशी मागणी शरद पवारांनी कोल्हापुरात केली आहे. “माझा पक्ष संसदेत लहान आहे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळाण्यासाठी घटनेत दुरुस्ती करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. घटना दुरुस्तीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी आणि विनंती मी करेन” असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
राज्यात जास्त काळ अस्वस्थतेच वातावरण हितावह नाही. राज्य सरकारच्या भूमिकेविरोधातील राग या आंदोलनातून बाहेर पडत आहे. त्यामुळे सरकारने सुप्रीम कोर्टात भक्कम बाजू मांडावी अशी मागणीही शरद पवारांनी केली आहे.
मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न हा भाजपा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या बाबत आम्ही काय बोलणार? कारण नसताना मुख्यमंत्र्याच्या जातीवर विधान करणं योग्य नाही, अस मला वाटतं असंही शरद पवार म्हणाले.
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्रातील जागा वाटपा बाबत लवकरच प्रक्रिया सुरू होईल, या बाबत काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, असं विधान लोकसभा निवडणुकीवर बोलताना शरद पवारांनी केलं आहे.
सरकारने राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करुन मराठ्यांना आरक्षण द्यावं : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2018 12:16 PM (IST)
राज्यघटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका सरकारने घेतली, तर मराठा, धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकते, असं म्हणत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविषयी भक्कम बाजू मांडण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -