इंदापूर (पुणे) : हिंमत असेल तर सरकार बरखास्त करा, मग कोण निवडून येतंय बघू, असं थेट आव्हान पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनी दिलंय. तसंच मराठा आरक्षणासाठी बैठक बोलवू नका तर तीन दिवसांचे अधिवेशन बोलवा, असा सल्ला त्यांनी दिलाय. इंदापूर प्रशासकीय भवनासमोर मराठा मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी भारत भालके इंदापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर तुफान टीका केली. “हिंमत असेल तर सरकार बरखास्त करा, त्यानंतर कोण निवडून येतंय बघू. आम्ही निवडून येऊ आणि आरक्षण देऊ. आरक्षणासाठी आता जीव चाललेत, तरुण मरायला लागलेत”, असं आमदार भालके म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र अशी बैठक बोलावू नका, त्यापेक्षा तीन दिवसांचे अधिवेशन बोलवा, तसा स्वतंत्र अधिकार आहे, कायद्यात तरतूद आहे,  आम्हाला आमच्या भूमिका मांडू द्या, असं भारत भालकेंनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांचा आरोप पंढरपुरात पूजेला विरोध करणारी,  गोंधळ घालणारी माणसं माझी असून, त्यांची नावं माहित आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केल्याचं भालके म्हणाले. भारत भालकेंचा राजीनामा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर-मंगळवेढयाचे आमदार भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना पत्र देऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 26 जुलैला त्यांनी आपला राजीनामा सादर केला. आमदार भारत भालके यांनी आपल्या राजीनाम्या पत्रात म्हटले आहे की, पुरोगामी शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये अस्थिरतेचे वातवरण झालेले आहे. मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम या समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळावे ही मागणी वारंवार ते करीत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व समाजाला लेखी आणि तोंडी आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही आज पावेतो आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे या सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्यामुळे सध्या राज्यामध्ये आंदालनाचा वणवा पेटलला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या सर्व समाजांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या पदावर राहण्यास नैतिकता वाटत नाही, म्हणून मी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा आपल्याकडे पाठवून देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.