पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या ताब्यात असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. पहिल्यांदा त्याला अडचणीतून बाहेर काढावे लागेल असा सल्ला आज शरद पवार यांनी भालके यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन करण्यासाठी आज शरद पवार सरकोली येथे भालकेंच्या निवासस्थानी आले होते. यावेळी गेल्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाजत गाजत भाजपमध्ये प्रवेश केलेले कल्याणराव काळे हे शरद पवारांच्या सोबत भालके यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी काळे यांनी भाषण करताना पवारांच्या मुळेच आपली साखर कारखानदारी आज जिवंत असल्याचे सांगत स्वगृही परतण्याचे संकेत दिले.


यानंतर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारत भालके यांची तब्येत कारखाना सुरु करण्याच्या चिंतेने खालावत गेली होती असे सांगत अडचणींना सामोरे जाताना त्यांची शाररिक शक्ती कमी पडल्याचे पवार यांनी सांगितले. आता हा अडचणीत आलेला कारखाना पुन्हा रुळावर आणावा लागणार असून भालके यांची अपूर्ण कामे पूर्ण करावी लागतील असे त्यांनी सांगितले.


भालके यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या वारसदाराबाबत पवार संकेत देतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, पवार यांनी याबाबतही सूचक मौन पाळत आपणास सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे असल्याचे सांगितले. पंढरपूर हे भाग्यवंतांचे गाव असून सध्या पंढरपूरचे भाग्य हलले आहे ते पुन्हा जागेवर आणावे लागेल असे सांगत पवारांनी गूढ अजून वाढवले आहे. आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आणि साखर कारखान्याच्या प्रश्ना संबंधीत केलेल्या कामाच्या अनेक आठवणी पवार यांनी सांगितल्या. भालके कुटुंबावर आपले कायमच लक्ष असते असे सांगत कोणीही काळजी करू नये. आपला प्रपंच आणि संसार नीट चालावा अशी अपेक्षा असते. अर्थकारण बिघडुन केलेल्या राजकारणात माझ्या सारख्याला फार रस नसल्याचे पवार यांनी सांगितले.


संबंधित बातमी : 


वा ना उत्पात ते भारत भालके, पंढरपूरवर कोरोनाचा मोठा आघात, दिग्गजांचं निधन