पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरं झाल्यानंतरही पुन्हा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र कोरोनाचा सर्वात मोठा आघात पंढरपूरवर झाला आहे. कोरोनामुळे पंढरपूर परिसरात कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. भारत भालके, सुधाकर परिचारक, वा ना उत्पात यांच्यासह अनेक नेत्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही दिवस, महिन्याच्या अंतराने अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे काळाच्या पडद्याआड गेली.
पंढरपूर कोरोनाचा फटका
- सर्वात पहिल्यांदा भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा कोरोनामुळे बळी गेला.
- यानंतर राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांच्यासह कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला
- मग पंढरपूरचे 25 वर्ष आमदार असलेले सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाले.
- वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .
- यानंतर भागावताचार्य वा ना उत्पात यांना कोरोनाने गाठले.
- आता काळ दुर्दैवाने विद्यमान राष्ट्रवादी आमदार भारत भालके यांच्यासारख्या झुंजार आमदाराला गमवावे लागले
संजय वाईकर
भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा 27 जुलै 2020 रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे होते. सोलापुरातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजाबापू पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तसंच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाबापू पाटील यांचं 13 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनामुळे निधन झालं. दु:खदायक बाब म्हणजे राजाबापू यांच्यासह त्यांचे धाकटे बंधू महेश पाटील आणि चुलते डॉ. अनंतराव पाटील यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला.
सुधाकरपंत परिचारक
सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनाही कोरोनाने गाठलं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात 17 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कैकाडी महाराज
राष्ट्रसंत कैकाडी बाबांचे पुतणे ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज इथे 25 सप्टेंबर 2020 रोजी उपचारादरम्यान निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुयायी आणि एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला.
वा ना उत्पात
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा ना उत्पात यांचे कोरोनामुळे 28 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले. पुण्यात उपचारादरम्यान वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वा ना उत्पात हे हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून प्रसिद्ध होते. वा ना या टोपण नावाने ते राज्यात ओळखले जात होते. अतिशय प्रखरपणे विचार मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते. वा ना यांच्या जाण्याने चालत बोलता ज्ञानकोश समाजाने गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
भारत भालके
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं 29 नोव्हेंबर 2020 निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन
भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचं कोरोनामुळे निधन
ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन