औरंगाबाद: राज्यातील मराठा समाजाचे मोर्चे हे सरकारविरोधातील असंतोषाचे प्रतीक असल्याचा घणाघात करत राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. एबीपी माझा दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवारांनी मराठा आरक्षण, मोर्चे आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्यावर भाष्य केलं.

कर्जमाफी, मराठा आरक्षण अशा मागण्यांसाठी मराठा तरुण स्वयंप्रेरणेतून रस्त्यावर उतरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच सत्तेत नसलेल्या मराठा नेत्यांची या मोर्चांना फूस असल्याचा आरोप धादांत चुकीचा असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

राज्यकर्ते शेतीबद्दल असंवेदनशील असल्यानं अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळेच अस्वस्थता हे मोर्चाचं मुख्य कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच इतर राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळतं तर महाराष्ट्रात काही नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केंद्राच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणीही पवारांनी केली आहे.

'प्रत्येक वेळी विनोद, काव्य करणं योग्य नाही'
केंद्रीय मंत्र्यांने जबाबदारीनं वक्तव्य केलं पाहिजे. समस्या गंभीर असते तेव्हा विनोद किंवा काव्य करुन चालत नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा समाचार घेतला.

आता कृती करायची वेळ आली आहे!

मराठा मोर्चा, आरक्षण, अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी असं या सर्वाविषयी राजकर्त्यांमध्ये एकमत आहे. तरीही मराठा समाजात ही अस्वस्थता का दिसून येते आहे? यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, 'याप्रकरणी एकमत जरी असलं तरीही याबाबत कृती दिसायला हवी. राज्यकर्त्यांनी सहमत आहे असं म्हणून चालत नाही. त्यांनी कृती करण्याची गरज असते. त्यामुळे आता कृतीची वेळ आली आहे. असं पवार म्हणाले.'

'आता माझ्या हाताता सत्ता नाही'

या सर्व प्रकरणी तुम्ही काय करणार? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, 'मी काय आता राज्यकर्ता नाही.  माझ्या हातात काही सत्ता नाही. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी याप्रकरणी ठोस भूमिका घेऊन तात्काळ कृती करणं गरजेचं आहे.'

कोपर्डी बलात्काराची घटना ही सामाजिकच नव्हे तर राजकीय दृष्टीकोनातूनही बरीच मंथन करणारी ठरली. त्याचं कारण म्हणजे लाखोंच्या संख्येनं निघणारे मराठा समाजाचे मूकमोर्चे. जो समाज संख्याबळात आणि सत्ताकारणात आघाडीवर आहे, तोच समाज कोणत्याही नेतृत्वाविना रस्त्यावर येतो आणि सामाजिक सुरक्षेबरोबरच शेती, आरक्षण, शिक्षणाच्या समस्या मांडतो. याबाबत आता अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत. या आणि अशाच अनेक प्रश्नांबाबत शरद पवारांनी रोखठोकं उत्तरं दिली.

VIDEO: