उस्मानाबाद: महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसानं मराठवाड्याचा पार कायापालट केला आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी या पावसानं सुखावला आहे. गेल्या तीन दिवसात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबादसह मराठवाड्यात सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली.
नांदेडच्या शेवडी गावावर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे. एवढा पाऊस या विभागानं कधीही पाहिला नव्हता. औरंगाबादेतही सलग दोन दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं आहे. लातूरवरही वरुणराजाची कृपा झाली असून निलंग्यातला मसलगा प्रकल्प 95 टक्के भरला आहे.
मराठवाड्यासह कोकणालाही परतीच्या पावसानं झोडपलं आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. काल कणकवली, लांजा, रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. मोठ्या विश्रांतीनंतर कोसळणाऱ्या पावसामुळं भात पिकाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळं कोकणातला बळीराज सुखावला आहे.
दरम्यान, मुंबईसह नवी मुंबई, रायगड परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रीपासूनच मुंबईतील अनेक भागात संततधार सुरु आहे.