बीड: एका रात्रीत पडलेल्या परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यातील चित्र पालटलं आहे. बीड जिल्ह्यातील पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून एकट्या केज तालुक्यात 98.0 मी. मी पावसाची नोंद झाली. कालच्या पावसाने केजमधील केजडी नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे.


परतीच्या पडलेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम करण्यात आली होती, त्यामुळे या कामाची फलश्रुती दिसून येते आहे.

येथील नागरिकांकडून केज नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते. काल रात्री झालेल्या पावसामुळे ही नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या कामाचे चीज झाले अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या.

मुसळधार पावसामुळे धनेगावच्या मांजरा धरणाची पाणी पातळी साडे तीन मीटरने वाढली आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचं वातावरण आहे.