Majha Katta : हत्तींनी आपल्याला माणूसकी शिकवली, जगण्याचं ध्येय आणि जगण्याचं कारण शिकवलं. मी काय काम करावं हे हत्तींनी मला शिकवलं असं हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी सांगितलं. जागतिक गजदिनानिमित्त हत्तीमित्र आनंद शिंदे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. जागतिक गजदिनानिमित्त त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. 


आनंद शिंदे यांना एलिफंट व्हिस्परर असं म्हटलं जातं. आनंद शिंदे यांना हत्तीच्या मनातील भाषा समजते. तसेच ते हत्तींसह इतर प्राण्यांसोबत मराठीतून संवाद साधतात हे विशेष. 


आनंद शिंदे हत्तींची भाषा कसे शिकले? 


जगातल्या कोणत्याही हत्तीला माणसाची भाषा समजते असं आनंद शिंदे सांगतात. ते म्हणतात की, हत्तींना शब्द फार कमी समजतात. पण त्यांना आपला टोन किंवा सूर समजतो. त्या आधारे ते आपली भाषा समजतात. इंदुरमधील मोती हत्तीशीही मी असाच संवाद साधला. हत्तींशी संवाद साधताना त्याच्याशी कसं बोलायचं हे शिकावं लागलं. त्यामध्ये हत्तीचं वय, त्याचा कळपातील स्थान लक्षात घ्यावं लागतं. 


हत्तीला अनुवांशिक स्मरणशक्ती असते. त्यामुळे हत्तीला एखादा रस्ता जर माहिती झाला तर त्याच्या पुढच्या पीढीला आपोआप त्याची माहिती होते. गडचिरोलीत येणारे हत्ती हे साडेतीनशे वर्षांपूर्वी होते. त्यानंतर आता आले. हत्ती आल्यानंतर त्यांच्या जेनेटिक्समध्ये असलेल्या नकाशामध्ये आपोआप अपडेट होतं आणि त्यानुसार त्यामध्ये वेळोवेळी बदल होते. बांबू हे हत्तींचे आवडतं खाद्य आहे. गडचिरोलीत बांबू मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी आलेले हत्ती हे छत्तीसगडमधून आलेले आहेत. गडचिरोलीत सध्या 60 हत्ती आहेत. हत्तींना लागणारे खाद्य जर जंगलात मिळालं नाही तर ते मग मानवी वस्तीत आणि शेतात येतात. कोल्हापुरातल्या हत्तींमध्ये हेच दिसतं. आता त्या ठिकाणी कर्नाटकातील हत्ती येतात. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये हत्ती फिरतात. 


हत्तींच्या कळपातील एखादा हत्तीचा मृत्यू झाला तर त्याचे योग्य पद्धतीने अंत्यदर्शन केलं जातं. दरवर्षी त्या ठिकाणी कळपातील सर्व हत्ती एकत्र येतात आणि श्रद्धांजली वाहतात असं आनंद शिंदे यांनी सांगितलं. 


हत्ती मानवाला चकवा कसे देतात?


हत्ती मानवाला चकवा देतात असं आनंद शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 23 हत्ती होते, त्यामध्ये कळप हा उजव्या बाजूला गेला. पण ठसा मात्र डाव्या बाजूला उमटवला. उजव्या बाजूला जाताना हत्ती पाऊल दाबून टाकत नव्हते, ते वरच्या वर टाकत होते. त्या रस्त्यावर कोणत्याही हत्तीने मूत्र विसर्जन केलं नाही किंवा शेण टाकलं नाही. डाव्या बाजूला जोरदार ठसा उमटवल्याने सर्वांना वाटते हत्ती तिकडेच गेले. 


हत्तींना विनाकारण त्रास दिल्यास किंवा पिल्लांना त्रास दिल्यास हत्ती हिंसक होतात असं आनंद शिंदे म्हणाले. हत्ती पिलांच्या बाबतील अतिसंवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना त्रास दिल्यास ते आक्रमक होतात. 


हत्ती दुखावल्या गेल्यात त्यांना वाईट वाटतं आणि त्याचवेळी त्यांना रागही येतो असं आनंद शिंदे यांनी सांगितलं. 


डॉ. जेकब अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केल्याचं आनंद शिंदे म्हणाले. ते म्हणाले की हत्ती दहा प्रकारचे आवाज काढू शकतात. त्यामध्ये फिमेल हत्ती जास्त बोलतात,  07 किमीमध्ये हत्ती एकमेकांशी बोलू शकतात. मेल हत्ती हे पायाने कंपने करुन एकमेकांशी संवाद साधतात. 


संबंधित बातमी :