अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरकारने उद्योजकांचं 82 हजार कोटींचं कर्ज माफ केलं. पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवर फक्त चर्चाच होते आहे आणि सध्याच्या कर्जमाफीत असलेल्या निकषांमुळे घरघरात भांडणं होतील, असंही शरद पवार म्हणाले.

अहमदनगरचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते पांडुरंग अभंग यांच्या अमृत महोत्सवी नागरी सत्कार कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवारांनी कर्जमाफी, शेतीच्या पायाभूत सुविधा आणि शेतमालाच्या दरावरुन सरकारला कानपिचक्या दिल्या. देशाच्या समृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष देण्याची गरज पवारांनी व्यक्त केली. वीज, पाणी आणि शेतमालाला दर देण्याची मागणी त्यांनी केली.

सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना शेतमालाच्या दराचं अश्वासन दिलं होतं. मात्र त्याचा विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कांद्याच्या दरात आता थोडा दर वाढताच दिल्लीत लगेच चर्चा होते. कांद्याने डोळ्यात पाणी आणल्याची चर्चा होते. मात्र दर पडल्यावर शेतकऱ्यांच्या अश्रूंकडे मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.