मुंबई भाजप सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.  


काय म्हणाले शरद पवार?

“या सरकारला संवेदना जर असत्या, तर नाशिकहून शेतकरी ज्यावेळी निघाले पायी तुडवत, त्यावेळीच संवेदना त्याचवेळी दिसायला हव्या होत्या. आता नेमलेली टीम त्याचवेळी पाठवली असती, त्यांच्याशी विचारविनिमय केला असता आणि त्यांच्या मागण्या मंजूर केल्या असत्या, तर इथपर्यंत यातना सहन करत कोण आलं असतं? त्यामुळे सहा दिवसात या संवेदना दिसल्या नाहीत.  या सरकारला शेतकरी वर्गासंबंधी आस्था नाही, हे आम्ही गेली तीन वर्षे पाहत आहोत.”

या सरकारला शेती, शेतकरी आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेची आस्था नाही

"शेतकऱ्यांमध्ये जी अस्वस्थता दिसतेय, ती आता रस्त्यावर आली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात ती अस्वस्थता आहे. याचं कारण या सरकारला शेती, शेतकरी आणि शेतीची अर्थव्यवस्था यासंबंधी आस्था नाही, या निष्कर्षाला लोक आले आहेत.", अशीही टीका पवारांनी भाजप सरकारवर केली.

"साधारण 12 वर्षे शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात, ही काही लहान गोष्ट नाही. त्यामुळे संपूर्ण देशात ही एक अस्वस्थता आहे. याचं दुखणं मांडायला कुणीतरी यात पुढाकार घेतला पाहिजे. आज तो लाल बावटावाल्यांनी घेतला आणि नाशिकपासून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढला.", असेही पवार म्हणाले.

VIDEO : शरद पवारांशी खास बातचित