नवी दिल्ली : तब्बल 200 किलोमीटर पायी चालत येऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणाऱ्या शेतकऱ्यांना आता माओवादाचं लेबल भाजप खासदारानं लावलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं आंदोलनातून शहरी माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, अशी मुक्ताफळं उत्तरमध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी उधळली आहेत.


पूनम महाजन काय म्हणाल्या?

"मला वाटतं लोकशाहीत आंदोलन करणं, आणि त्यातही जेव्हा सरकारकडून अपेक्षा जास्त असतात, तेव्हा आंदोलनं होतात. ती होत आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे, उत्तर महाराष्ट्राचे शेतकरी मुंबईत आले. त्यात दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत, त्यांनी हे मान्य केले आहे की, कर्जमाफी झाली होती गेल्यावेळी, पण येणाऱ्या काळ्यात त्यांना अपेक्षा आहेत सरकारकडून. मुख्यमंत्री त्यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यावर उपायही काढले जातील. फक्त यात बघण्यासारखे आहे की, शेतकरी आले, अपेक्षा जरुर असतील, त्यांच्या हातात लाल फित होती आणि कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा होता. तर याच्यावरही चर्चा पुढच्या वेळेत करणं गरजेचं आहे.", असं पूनम महाजन म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, "शहरी माओवाद हा देशभरात जास्त वाढतो आहे. महाराष्ट्रात तर शहरी माओवादाची नवी संकल्पनाच आली आहे. ती पुण्यातून सुरु झालेली आहे. हे शिकले-सवरलेले कम्युनिस्ट विचारांची जी पिढी आहे, जी आपल्या टॅक्सवर चाळीशीत पीएचडी करते, ती या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जाऊन भरकटत आहेत."

सुमारे 200 किलोमीटरचा रस्ता उन्हातान्हातून पायी कापत शेतकरी नाशिकहून मुंबईत पोहोचले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांनी पायातून येणाऱ्या रक्ताची पर्वा केली नाही. अशा स्थिती लोकांना सहानुभूती देत, आधार देण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील खासदारच माओवादाचं लेबल लावून शेतकऱ्यांची हेटाळणी करताना दिसत आहे.

खासदार पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

पूनम महाजन या उत्तर-मध्ये मुंबईतून भाजपच्या खासदार आहेत. भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षही त्या आहेत. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पूनम महाजन या कन्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळेंची टीका

"पायात काटा रुतल्यावर वाहणारं रक्त लाल असतं म्हणून ते माओवादी नसतं. शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामालाही कुठल्याच राजकारणाचा वास नसतो. हा मोर्चा कष्टकऱ्यांचा आहे. न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी माओवादी म्हणणाऱ्यांचा निषेध.", अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पूनम महाजनांवर केली आहे.


VIDEO : पाहा खासदार पूनम महाजन काय म्हणाल्या?