मुंबई: इंदिरा गांधींना दोष द्यायला निघालेल्या मोदींना,नंतरच्या काळात केंद्रामध्ये सत्तेत भाजप सहभागी होतं. त्यानंतर त्यांनी नोटाबंदी का केलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित करुन मोदींनी केलेल्या नोटाबंदीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाले असल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत विरोधकांचा समाचार घेताना इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील किस्सा सांगितला. '1971च्या दरम्यान नोटाबंदी झाली असती, तर देश बर्बाद झाला नसता,' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससोबतच विरोधकांवर केली. त्याचा शरद पवारांनी आज समाचार घेतला.
पवार पुढे म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळ्या पैशांसदर्भातील भूमिकेला आम्ही समर्थनच दिलं, पण नोटाबंदीसाठी जी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करायला हवी होती, ती केली नाही. त्यामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत.
''एकीकडे बँक आणि एटीएममध्ये नोटा नाहीत. तर दुसरीकडे नोटाजप्त केल्याच्या बातम्या रोज वाचायला मिळत आहेत. कंपन्यांमधूनही आता कामगारांची कपात सुरु झाली आहे. यापुढचा टप्पा बांधकाम व्यवसाय असेल,'' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचाही पवारांनी यावेळी समाचार घेतला, ''नरेंद्र मोदींनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, पाकिस्तानला 'लव्ह लेटर क्यू भेजते हो, उनका बंदोबस्त कर दो.' पण सीमाभागात एकूण 162 हल्ले झाले. यामध्ये 57 जवान शहीद झाले. त्याचं लक्ष्य संरक्षण व्यवस्था असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.