मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.


2009 च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी पुण्याचा गड राखला होता. पण कॉमनवेल्थ खेळातील भ्रष्टाचार आरोपानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. विश्वजित कदम हे आता कडेगाव-पलूसचे आमदार आहेत. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्याची माहिती आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भाजप सोडून इतर सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. अशा वेळी राज्यसभेऐवजी निवडणूक लढवून लोकसभेत असणं पवारांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही रणनिती असल्याची सूत्रांची माहिती आहे.

बारामती हा शरद पवार यांचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ होता. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती मतदारसंघ सोडल्यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2014 आधी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. पण 2019 ची लढाई पाहता पवार स्वतः लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून भाजपच्या अनिल शिरोळे यांनी पाच लाख 69 हजार 825 मतं मिळवत विजय मिळवला होता. तर विश्वजित कदम यांना 2 लाख 54 हजार 56 मतं मिळाली होती.