Pritisangam Karad: गेल्या तीन साडे तीन वर्षांपासून अस्थिरतेच्या लाटांवर स्वार असलेल्या महाराष्ट्र राजकारणाचा पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. आता यावेळच्या भूकंप राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजित पवार यांनी घडवून आणला आहे. त्यांनी नेमके किती आमदार फोडले हा आकडा अजूनही निश्चित नसला, तरी त्यांनी पक्षात फूट पाडून थेट पक्षावर दावा केला आहे. दुसरीकडे, नेहमीप्रमाणे त्यांचे काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांनी बंड केल्याचे मान्य करत पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्या पद्धतीने त्यांनी 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेला प्रचार करून घाम फोडला होता आणि सातारमधील पावसातील सभा अविस्मरणीय झाली होती, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सातारमधून राजकीय अन् सामाजिक उर्जा देणाऱ्या प्रितीसंगमावर आज शरद पवार पोहोचले.
शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचा जिगरी दोस्त सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी लढवय्या नेत्याला पुन्हा बळ देण्यासाठी कराडमधील प्रितीसंगमावर हजेरी लावली. या प्रितीसंगमावरून पुन्हा एकदा शरद पवार यांनी रणशिंग फुंकल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रीतिसंगमाचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा अमृतकलश आणला ते यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ याच प्रितीसंगमावर आहे.
यशवंतराव चव्हाण यांची समाधी याच प्रीतिसंगमावर
कराडमध्ये कृष्णामाई अर्थातच कृष्णा नदी आणि कोयना नदीचा संगम झाला आहे. या ठिकाणास प्रीतिसंगम म्हटले जाते. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेलं कोयना धरणही याच कोयना नदीवर वसलेलं आहे. याठिकाणी कृष्णामाईचे मंदिर आहे. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. विकसित महाराष्ट्राच्या शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या यशवंतरावांची केंद्रीय मंत्रिपदाची व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली तितकीच यशस्वी ठरली. ज्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती अशा यशवंतराव चव्हाण यांची समाधी याच प्रीतिसंगमावर आहे.
कोयना आणि कृष्णेचा संगम असलेल्या प्रीतिसंगम हे यशवंतराव चव्हाणांच्या आयुष्यातील विरंगुळ्याचे स्थळ होते. या परिसरात वेगवेगळी देवालये आहेत. विधायक कार्याची सुरुवात करायची असल्यास तर इथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले जाते. महाराष्ट्राच्या समाजकारणातील तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रीतिसंगमाकडे पाहिले जाते. असा देदीप्यमान वारसा असलेल्या प्रितीसंगमावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा लढण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
अजित पवारांचा आत्मक्लेश
भाजपच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीत बंड केलेल्या अजित पवारांनी धरणातील पाण्यावरून अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात दहा वर्षांपूर्वी भाजपनेच रान उठवले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यावेळी केली होती. अजित पवार यांनी दोनदा माफी मागितल्यानंतर याच प्रीतिसंगमावरून प्रायश्चित म्हणून आत्मक्लेश केला होता. आज राष्ट्रवादीत असणारे तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आत्मक्लेश म्हणजे नाटक असल्याची टीका केली होती. दुसरीकडे, अजित पवारांनी दोनदा माफी मागितल्यानं आता विषय संपला आहे, असं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यावेळी म्हटले होते. जेव्हा जेव्हा अजित पवार यांच्याकडून भाजवर टीका केली जाते तेव्हा तेव्हा त्यांना धरणातील वाक्याची आठवण करून दिली जाते. संजय राऊत यांनी केलेल्या थुकगिरीनंतर सुद्धा त्यांनी अजित पवारांना धरण आठवून दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या :