नवी दिल्ली : मराठा समाजाने नऊ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या बंदमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. हा मराठा समाज आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव आहे, असा आरोप करत मराठा समाजाने शांततेला प्राधान्य द्यावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
'मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. राज्यकर्त्यांचा हा डाव हाणून पाडतानाच हिंसा, जाळपोळीचे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे', असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवार यांनी एक पत्रक काढून मराठा आंदोलकांना हे आवाहन केलं आहे. 'मराठा आंदोलनाला बहुजनांचा पाठिंबा मिळालेला आहे. त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही, याची मराठा आंदोलकांनी काळजी घ्यायला हवी', असं शरद पवार यांनी या पत्रकात म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केलं होतं. त्या आदर्शांना धक्का लागेल असं आंदोलन करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.
मराठा समाजाला बहुजन समाज आणि इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. त्यांची ही खेळी यशस्वी होऊ देऊ नका, असं सांगतानाच आरक्षणासाठी काही संविधानिक प्रक्रिया असतात. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यासाठी शांतता हवी आहे. शिवाय राज्यांतील उद्योग धंद्यातील गुंतवणूक थांबेल आणि बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असं आंदोलन करू नका, असंही या पत्रकात म्हटलं आहे.
या पत्रकात गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेच्या शेतकरी आत्महत्येच्या संदर्भातील अहवालाचा हवालाही दिला आहे. जमिनीचे लहान-लहान तुकडे पडत गेल्याने मराठा समाजाची स्थिती हालाखीची बनली आहे. 28 टक्के मराठा भूमीहीन आहेत. तर त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण 46 टक्के आहे. त्यामुळेच मराठा तरुणांमध्ये असंतोष खदखदत आहे. मात्र त्यावर दगडफेक, जाळपोळ करणे किंवा आत्महत्या करणे हे पर्याय होऊच शकत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
बंद कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड, औरंगाबादेत आंदोलकांची धरपकड सुरु
मराठा आंदोलन : वाळूज एमआयडीसीतील सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड
मराठा आंदोलनामुळे 25 दिवसात एसटीचं 50 कोटींचं नुकसान
मराठा आंदोलनादरम्यान संयम आणि शांतता बाळगा : नांगरे-पाटील
महाराष्ट्र बंद : आचारसंहितेचं उल्लंघन, पेटवा-पेटवी कोण करतंय?
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2018 07:38 PM (IST)
राज्यकर्त्यांचा हा डाव हाणून पाडतानाच हिंसा, जाळपोळीचे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावे', असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -