मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख 10 ऑगस्टऐवजी आता 14 ऑगस्ट करण्यात आली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी 7 ते 8 ऑगस्ट संप पुकारला होता, त्यामुळे जात पडताळणीची कामे प्रलंबित राहिल्याने हे चार दिवस विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आले आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माण-फार्म डी., वास्तूशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग या पदवी अभ्यासक्रम आणि एमबीए-एणएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

यंदा नीट आणि सीईटी प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि प्रवेश प्रक्रिया ठरलेल्या मुदतीत पूर्ण व्हावी यासाठी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्याआधी 24 दन 2018 रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार प्रमाणपत्राच्या सादरीकरणासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट 2018 या कालावधीत केलेल्या संपामुळे जात पडताळणी करण्याचे काम प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांना आणखी वेळ मिळावा म्हणून सरकारने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठीचा अवधी वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.