पुणे : माझ्या दृष्टीने सध्या काही विशेष घडत नाही. पक्षांतराचं म्हणायचं तर मला याची थोडीही चिंता वाटत नाही. सध्या भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. मात्र याला उत्तर कसं द्यायचं हे आम्हाला ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीतून काही महत्वाच्या नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणाले की, पक्षांतर केलेल्या लोकांना केंद्र आणि राज्यात सत्तेशिवाय आपल्याला निवडून येणं शक्य नाही, अशी भीती मनात होती. असा वर्ग अस्वस्थ, अस्थिर झालाय. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेचा वापर करून अनेकांना ओढून घेत आहेत, असे पवार म्हणाले.

काही लोक माझ्याशी बोलत आहेत की ईडी, इन्कम टॅक्स ची मदत घेतली जातेय. त्याचं उदाहरण कोल्हापुरात दिसलं. ते येत नाही म्हणताच काय घडलं हे सर्वांसमोर आहे. त्यामुळं सत्तेचा गैरवापर सुरु आहे हे स्पष्ट होतंय, असे ते म्हणाले.

1980 मध्ये आमचे 60 लोक निवडून आले. मी 15 दिवस परदेशात होतो, त्यादरम्यान आमचे सर्व लोक फोडले. मी देशात परतलो तेंव्हा आमच्याकडे फक्त 6 आमदार शिल्लक होते. पण तेंव्हाही मला चिंता नव्हती. कारण त्यानंतरच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले ते पराभूत झाले आणि पुन्हा आमचे 60 आमदार निवडून आले. त्यामुळं हे सर्व आम्ही अनुभवलंय, त्याला कसं उत्तर द्यायचं हे ही आम्हाला ठाऊक आहे आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याची ही आम्हाला काळजी आहे, असे ते म्हणाले.

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून शरद पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्यानंतर आता वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार आहेत.  तर राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनीही राजीनामा दिला असून त्या देखील भाजपच्या वाटेवर आहेत.



संबंधित बातम्या

चित्रा वाघ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का गेल्या?  

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर, चित्रा वाघांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा
राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती