मुंबई : मराठा आरक्षणाप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला मराठा समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रणं धाडली आहेत. मात्र या बैठकीला येण्यास श्रीमंत शाहू महाराजांनी नकार दिला आहे.
‘सह्याद्री’वर बैठक
मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मराठा समाजातील जेष्ठ विचारवंत, कलाकार, माजी न्यायाधीश, सनदी अधिकारी यांना हे निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक निश्चित करण्यात आली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीआधी मुख्यमंत्री या विचारवंतांशी सल्लामसलत करणार आहेत.
शाहू महाराजांचा नकार
मराठा आरक्षणपश्नी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराजांनी नकार दिला आहे. आरक्षणावर तोडगा काढणासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांसह इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर या तिघांनीही बैठकीस जाण्यास नकार दिला.
श्रीमंत शाहू महाराज काय म्हणाले?
58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत श्रीमंत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं.
मुंबईत मराठा ठोक मोर्चाच्या समन्वयकांची बैठक
आज आंदोलनाच्या 16 व्या दिवशी सकल मराठा ठोक मोर्चाच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. मुंबईत ही बैठक पार पडेल. यामध्ये मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
भाजपच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
दरम्यान मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे विधानसभा आणि विधानपरिषदेचे सर्व आमदार उपस्थित असतील.
‘जेलभरो’ला तरुणवर्गाचा प्रतिसाद
मुंबईतल्या आझाद मैदानावर काल सार्वत्रिक जेलभरो आंदोलन करण्यात आलं. या जेलभरो आंदोलनात मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग सहभागी झाला होता. आंदोलकांनी आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. यानंतर आणि दुपारी 3 वाजता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा
दरम्यान, 9 ऑगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीस श्रीमंत शाहू महाराजांचा नकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2018 07:39 AM (IST)
58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत श्रीमंत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -