विरार : रस्त्यावर बेवारस पडलेल्या एका वृद्ध महिलेला विरार पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. या वृद्ध महिलेला विविध आजारांनी ग्रासलं होतं, त्यामुळे तिला त्वरित उपचाराची गरज होती. महिलेची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने तिला मदत करण्यास पोलिसांना अनेक अडचणी आल्या. अखेर न्यायालयाच्या मदतीने पोलिसांनी या वृद्ध महिलेला उपचारासाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.


विरारच्या रस्त्यावर फिरताना सापडलेल्या या महिलेचं नाव काय? पत्ता काय? या कोणत्याही प्रश्नाचं या वृद्ध महिलेकडे उत्तर नाही. या अनोळखी महिलेला विविध आजारांनी ग्रासलं आहे, मात्र तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याने तिला कोणीही मदत करण्यासही तयार होत नव्हतं.


महिलेची अवस्था बिकट होती. अंगावर सर्वत्र जखमा होत्या, त्यातून रक्तस्त्राव होत होता. कपडे फाटले होते, पोटाची खळगी भरण्यासाठी ती भीक मागत होती. विरार पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला आणलं आणि तिच्यावर प्राथमिक उपचार केले. पोटभर जेवण दिलं आणि नवीन कपडेही दिले.


वैद्यकीय तपासणी केली त्यावेळी महिलेला दुर्धर आजारानं ग्रासलं असल्याचं पोलिसांना कळालं. तिच्यावर वेळीच उपचार होणं गरजेचं होतं. मात्र तिला कोणतंही हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करून घेण्यास तयार झालं नाही. याशिवाय विविध सामजिक संस्थानीही तिच्यासाठी आपले दरवाजे बंद केले.


अखेर महिलेला मदत करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला या वृद्ध महिलेवर उपचारासाठी दाखल करुन घेण्याचे आदेश दिले. या घटनेतून खाकीतली माणुसकी पुन्हा एकदा समोर आली आहे.


महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पुष्पलता सावंत असं तिचं नाव आहे. तिला तीन मुलं आणि एक मुलगी असून ते दादरला राहतात. पती शिक्षक होते, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. महिलेने दिलेली सर्व माहिती पोलिसांनी तपासून पाहिली, मात्र अशा प्रकारची कोणीही व्यक्ती आढळून आल्या नाही. त्यामुळे या महिलेचे नातेवाईक सापडले तर त्यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.