मुंबई: कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार होणार आहे. शहाजी महाराजांच्या कर्नाटकातील समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी उचलली आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या  माध्यमातून यासाठी पाच लाख रुपयांचा प्राथमिक निधी दिला आहे.


महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात उभं करण्याची तयारी सुरू असतांना, शिवरायांचे जन्मदाते, त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या शहाजी महाराजांची समाधी मात्र कर्नाटकात उघड्याबोडक्या अवस्थेत आहे. कर्नाटकातल्या दावणगोरे जिल्ह्यातील चेन्नागिरी तालुक्यात हेदिगेरे या ठिकाणी शहाजी महाराजांची ही समाधी गेली अनेक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत आहे. काही दिवसांपूर्वी कादंबरीकार विश्वास पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून ही गंभीर बाब समोर आणली होती. ही  माहिती राज्याचे  नागरविकास आणि  सार्वजनिक  बांधकाम  मंत्री   एकनाथ  शिंदे  यांच्यापर्यंत  पोहोचली. त्यांनी  तात्काळ  कादंबरीकार  विश्वास  पाटील  यांच्याशी  आणि  श्री शहाजीराजे  समाधी स्मारक  ट्रस्टशी  संपर्क  साधत या समाधीचा  जीर्णोद्धार  करण्याची  इचछा  व्यक्त  केली. 


नागरिकांनी पुढाकार घेणं गरजेचं
कर्नाटकात शहाजीराजे समाधी स्मारक ट्रस्टद्वारे तेथे शहाजी महाराजांसोबत गेलेल्या मराठ्यांचे काही वंशज काम करत आहेत. महाराष्ट्रातून मंत्री एकनाथ शिंदेंनी या समाधीच्या कामाकरता श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून पाच लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. मात्र, शहाजीराजांच्या कर्नाटकातील भव्य समाधीकरता महाराष्ट्रातूनही मोठी मदत येणं गरजेचं आहे.


गेली साडेतीनशे वर्ष होदिगेरे परिसरात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी उघड्यावर आहे. स्वराज्य संकल्पकाच्या या समाधीसाठी छत्र उभं रहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पित्याचा यथोचित सन्मान ठेवला जावा अशी इच्छा  कर्नाटकातील शहाजीराजांसोबत गेलेल्या मराठ्यांच्या वंशजांनी व्यक्त केलीय.


संबंधित बातम्या: