धुळे: बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना धुळे जिल्हयातील पिंपळनेर येथे घडली आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशनपासून जवळच असलेल्या घोड्यामाळ परिसरातील एका बापाने १७ वर्षीय गतिमंद मुलीचे लैंगिक शोषण करून, तिला तिसऱ्यांदा गर्भवती केल्याची घटना समोर आली आहे.


 

ही पीडित मुलगी गेल्या पाच वर्षांपासून जन्मदात्या बापाचे अत्याचार सहन करते आहे. गावातील काही जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गोमा डोंगर भौरे या ४५ वर्षीय नराधम बापाला अटक केली. पीडित मुलीची धुळे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

 

आईचं छत्र हरवलेली ही पीडित मुलगी तिच्या बापासोबत  झोपडीत राहत होती, ती मतिमंद, अपंग असल्याने तिचा बाप तिला घराबाहेर जाऊ देत नव्हता. पीडित मुलीवर नराधम बापाने केलेल्या बलात्काराच्या घटनेत एक साडेतीन वर्षांची, दुसरी अडीच वर्षांची मुलगी आहे, आणि आता ती पीडित मुलगी तिसऱ्यांदा गरोदर आहे. पीडित मुलीला  सध्या एका मतिमंद विद्यार्थिनींच्या संस्थेत दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

 

कोपर्डीची घटनेवरून राज्य हादरलं असतांना, पिंपळनेरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे कुंपणानेच शेत खाल्ल्याने न्यायाची आस कोणाकडे धरणार असा प्रश्न उभा राहतोय.