हिंगोली : परतीच्या पावसाने काल रात्री हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे जोरदार हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिरातही या पावसामुळे गटाराचं पाणी शिरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

औंढा नगर पंचायतीकडून गटार नियमित साफ केली जात नसल्याने पाणी तुंबलं. गटार तुंबल्याने गटाराबाहेर घाण पाणी वाहू लागलं. हेच पाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागनाथ मंदिरात शिरलं. गटाराचं घाण पाणी शिरल्याने मंदिरात सर्वत्र घाण पसरली होती.

मंदिरात पाणी शिरल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घाण पसरल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गटारांची घाण साफ होत नसल्याने गटार तुंबतात आणि हे तुंबलेलं गटाराचं पाणी चक्क मंदिरातही शिरतं.

यावर्षी दुसऱ्यांदा गटाराचं घाण पाणी मंदिरात शिरलं आहे. तरीही नगर पंचायत आणि नागनाथ मंदिर संस्थान झोपेत आहे. वारंवार गटाराचं पाणी मंदिरात शिरुनही साफसफाई केली जात नसल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भाविक करत आहेत.