सांगलीतील कुपवाड एमआयडीसीमधील विविध कंपन्यांच्या कारखान्यांमध्ये 20 ते 25 हजारापेक्षा जास्त परप्रांतीय काम करतात. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ते नेहमी कुपवाड बाजारात येतात. काल संध्याकाळी दैनंदिन वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत आले असता, मनसे सैनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.
मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप करत, परप्रांतीयांना हकलून लावण्यासाठी हे आंदोलन केल्याचा दावाही सावंत यांनी केला.
याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुपवाड शहर प्रमुख विनय पाटील यांचाही समावेश आहे. तर मनसेचे पदाधिकारी आणि इतर तरुणांना पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्याभरात परिसरातून 16 पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या घटनांपाठीमागे परप्रांतीयच असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.