परभणी : आजोबा म्हणजे नातवांसाठी संस्कारपीठ, सर्वात लाडकं व्यक्तिमत्त्व मात्र याच नात्याला काळिमा फासणारी घटना परभणीच्या सेलुतील चिकलठाणा येथे घडली आहे. चुलत आजोबांनी चक्क आपल्या नातवाचा धारदार शस्त्राने निर्घृन खून केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खून करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केली आहे.


परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यात येणाऱ्या चिकलठाणा गावात अभिराज श्रीराम जाधव हा सात वर्षीय चिमुरडा घरासमोर खेळत होता. त्यावेळी दिगंबर जाधव (वय 56) यांनी चिमुरड्याचा अचानक गळा दाबण्यास सुरुवात केली. अभिराज याच्या आईच्या तो प्रकार निदर्शनास आला. तेव्हा त्या धावुन आल्या व त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी इतर नातेवाईकही तिथे आले आणि दिगंबर जाधव यांच्या तावडीतून अभिराज याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिगंबर जाधव याने त्याच्या हातातील विळ्याने अभिराज याच्या छातीवर व पोटावर वार केले. त्यामुळे गंभीर अवस्थेत अभिराज यास सेलूतील उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी धावपळ करीत दाखल केले.परंतु अभिराज यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.


अचानक घडलेल्या या अनपेक्षित प्रकाराने कुटुंबिय अक्षरशः हादरले आहेत. सात वर्षीय बालकाच्या निर्घृण खुनाने गावकरीही संतप्त झाले आहेत. सेलू पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व दिगंबर जाधव यास अटक करण्यात आलीय. महत्त्वाचे म्हणजे दिगांबर जाधव हा अभिराज याचा चुलत आजोबा आहे, अस नातं असताना त्यांनी हे कृत्य का केले? घटनेचे नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र या घटनेने केवळ सेलु तालुकाच नाही तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.