मुंबई : अमरावती आणि अकोला जिल्ह्यात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला असून तर सहाजण जखमी झाले आहेत. यात शेतमजूर आणि प्रवाशांचा समावेश आहे. मृतांमध्ये 12 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. आज संध्याकाळी अकोला आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला आहे. त्यावेळी या घटना घडल्या.

अमरावतीत वीज पडून तिघांचा मृत्यू

अमरावती ते अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णाजवळ वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. मृतांमध्ये दोन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे.  बोपापूर येथील सोनाली गजानन बोबडे (वय 35), अचलपूरच्या विलायतपुरा येथील शोभा संजय गाठे (वय 45) आणि अंजनगाव सुर्जी येथील सैय्यद निजामोद्दीन सैय्यद बदरोद्दीन (वय 65) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत.

जिल्ह्यातील काही भागात गडगडटात तसेच विजांसह अचानक पावसास सुरुवात झाली. अचानक पाऊस सुरु झाल्याने दुचाकीने अचलपूरकडे जाणाऱ्या काही प्रवाशांनी आसेगाव पूर्णा परिसरात झाडांचा आसरा घेतला. अशातच झाडावर अचानक वीज कोसळली. या घटनेत दोन महिला आणि एक पुरूष असा तिघांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण जखमी झाले आहे. वीज पडल्याची माहिती मिळताच जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तिघांना मृत घोषित करण्यात आले.

अकोल्यात चार जणांचा म्रूत्यू

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यातील वरुड बुझरुक गावात आज दुपारी वीज पडून चार शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे. म्रूतांमध्ये गजानन अढाऊ, गणेश मोकळकार आणि लक्ष्मी अढाऊ या महिलेचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. अकोट तालूक्यातील बेलूरा येथे दादाराव पळसपगार या शेतमजूराचा म्रूत्यू झाला आहे. यात एकजण जखमी झालाय.