मुंबई : पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात सत्ताधारी पक्षाला दिवाळीत गोडधोड खाता आलं नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेला दिला. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे, त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील अशी खात्री होती. पण निकालाची आकडेवारी पाहता भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, हा भाजपासाठी मोठा धक्का समजला जातो. सत्ता स्थापनेसाठी आता भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नाही, म्हणून अजित पवारांनी हा टोला सत्ताधाऱ्यांना दिला.
अजित पवार म्हणाले, लोकसभेला हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे कार्यकर्ते थोडे वेगळ्या मनस्थितीत होते. सत्ताधाऱ्यांनी त्यांना सांगितलं 'तुम्ही हरणार, या आमच्याकडे, हे केल्यामुळे जिवा भावाचे सहकारी सोडून गेले’. पक्षांतर केलेले आमचे नेते सोबत राहिले असते तर पूर्ण सरकार आणलं असतं. पण आता या चर्चेला अर्थ नाही.
आपल्या विजयाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, मला विश्वास बसत नाही 1 लाख 60 हजार मताधिक्याने विजय मिळाला. सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. आम्ही निवडणुकीच्या निकालावर खुश आहोत. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करणारे खुश नाहीत. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विजय मिळाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे उभे राहिले तेव्हा एक आमदार होता, आता शिरुर लोकसभा मतदार संघात सगळे आमदार राष्ट्रवादीचे आले आहे. लोक केंद्रात आणि राज्यात वेगळा बदल करतात हे स्पष्ट झाले.
जोमाने काम करू
जे पराभूत झाले त्यांच्याशी पण चर्चा करु कुठे कमी पडलो याचा अभ्यास करुन पुन्हा जोमाने सुरुवात करणार. महाराष्ट्रातील जनतेने आघाडीला बळ दिले.
सगळं सुरळीत आहे
विधानसभा निवडणुकीत सगळीकडे भाऊ बहीण काही तरी सुरू होतं. आधी काका पुतणे असं चालू होतं. परळी, मुंब्रा आमच्या बारामतीत भाऊ बहीण सगळ नीट सुरु आहे.
प्रचारसाठी अजून वेळ हवा होता
रोहित पवार गेले वर्षभर मेहनत करत होते. वर्षभर त्यांनी कष्ट घेतले आणि सगळ्यांनी त्यांना साथ दिली. महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्याला त्यांनी हरवलं. दौंड येथील जागा फक्त 700 मतांनी गेली. नगरमध्ये तर एक जागा निवडून येणार नाही असं बोललं जात होते. आघाडीच्या 8 जागा आल्या. प्रचारासाठी एक आठवडा जर अजून मिळाला असता तर आघाडीचं सरकार आलं असतं.
सत्ताधारी पक्षाला दिवाळीत गोड खाता आलं नाही : अजित पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2019 08:25 PM (IST)
लोकसभेला हवं तसं यश मिळालं नाही त्यामुळे कार्यकर्ते थोडे वेगळ्या मनस्थितीत होते. पक्षांतर केलेले आमचे नेते सोबत राहिले असते तर पूर्ण सरकार आणलं असतं. पण आता या चर्चेला अर्थ नाही
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -