पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. पूना हॉस्पिटलमध्ये भाई वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. भाई वैद्य स्वादुपिंडाचा कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भाई वैद्य यांचं पार्थिव रात्री लॉ कॉलेज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी 7 वाजता साने गुरुजी स्मारक येथे ठेवले जाईल. दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा आणि संध्याकाळी 6 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
पार्थिव सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक-राजकीय कारकीर्दीत आयुष्यभर लोकशाही आणि समाजवादी मूल्यांची जोपासना करणारं व्यक्तिमत्त्व भाई वैद्य यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन इत्यादी अनेक आंदोलनांमध्ये भाई वैद्य यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता.
राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील विषयांवर भाई वैद्य हे अभ्यासपूर्ण मांडणी करत असत. तळागाळातील लोकांच्या हक्कांसाठी भाई वैद्य आयुष्यभर झटले.
तळागाळातल्या जनतेसह विद्यार्थी, कामगार... ज्या कुणावर अन्याय होईल, तिथे न्याय मागण्यासाठी भाई वैद्य धावून जात असत. अलीकडे शिक्षण हक्कांसाठी सत्याग्रह करुन त्यांनी स्वत:ला अटकही करुन घेतली होती.
भाई वैद्य यांचा अल्पपरिचय
भाई वैद्य यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. शालेय जीवनात असताना 1942 साली भाईंनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. त्यानंतर गोवामुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रीयपणे उतरले होते. त्यावेळी त्यांना मारहाण, तसेच तुरुंगवासही भोगावा लागला होता. देशात आणीबाणी लागू झाली, त्यावेळी आणीबाणीविरोधात लढताना त्यांना 19 महिने तुरुंगात जावे लागले होते.
चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वात कन्याकुमारी ते दिल्ली भारतयात्रेत त्यांनी 4 हजार किलोमीटर पदयात्रा पूर्ण केली होती.
महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री, पुण्याचे महापौर, जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांसह अनेक महत्त्वाची पदं भाईंनी भूषवली.
दिग्गजांकडून भाईंना आदरांजली
"देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्यानंतर सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेणाऱ्या जयप्रकाश नारायण, मधु लिमये, एस. एम. जोशी या विचारवंतांसोबत भाई वैद्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा कालावधी घालवला. पुणे परिसरच नव्हे तर महाराष्ट्र पातळीवर सातत्याने समाजवादी विचाराला शक्ती देण्याचे कार्य भाईंनी केले. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि तरुण पिढी यांच्या समवेत भाईंनी आपले आयुष्य व्यतीत केले.
महाराष्ट्र विधानसभेमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व भाईंनी केले. माझ्या नेतृत्वातील पुलोद मंत्रिमंडळामध्ये त्यांनी गृहखात्याचे मंत्रिपद सांभाळले. भाईंनी आपले प्रशासन कौशल्य त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले.
भाई आज आमच्यामध्ये नाहीत, हे आज आम्हा सर्वांना सहन करणे कठीण आहे. भाईंनी ज्या विचारांसाठी आणि वर्गासाठी अथकपणे आयुष्यभर काम केले त्या विचारांच्या हिताची जपणूक करण्याचा प्रयत्न करणे, हीच भाईंना खरी श्रद्धांजली होईल." - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
“गृहराज्य मंत्री म्हणून लाच म्हणून देणारी व्यक्ती त्या रकमेचा बॅगसह पकडून देणारे भाई 40 वर्षे महाराष्ट्राच्या लक्षात आहेत. अशी माणसं आजच्या पेटी-खोक्याच्या राजकारणात दंतकथा वाटतात. या जागा भरुन काढणारी माणसं आता कुठून आणायची?”, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
“आठ-दहा दिवसांपूर्वीपर्यंत ते कार्यक्रमात असायचे. समाजवादी राजकारण उभं रहावं यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन कामाला लागायचे. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी काम केलं. तरुण वयापासून ते 90 वर्षांपर्यंत त्यांनी वैयक्तिक आयुष्याला एकही दिवस दिला नाही.”, अशा भावना सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं निधन
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
02 Apr 2018 08:23 PM (IST)
तळागाळातल्या जनतेसह विद्यार्थी, कामगार... ज्या कुणावर अन्याय होईल, तिथे न्याय मागण्यासाठी भाई वैद्य धावून जात असत. अलीकडे शिक्षण हक्कांसाठी सत्याग्रह करुन त्यांनी स्वत:ला अटकही करुन घेतली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -