सोलापूर : निवृत्तीनंतर काय... हा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना कायमच सतावत असतो. त्यात ती व्यक्ती ग्रामीण भागातील असेल, तर मग वाढत्या वयाचे ओझे न झेपणारेच. कारण अनेकदा घरातल्या इतर सदस्यांकडून दुर्लक्ष होत असतं. मात्र, अशा एकंदरीत स्थितीत कुणी सायकल स्पर्धेत भाग घेत असेल, तर...? सोलापुरातील 75 वर्षीय आजोबांनी चक्का सायकल स्पर्धेत सहभाग घेतला आणि तब्बल चार किलोमीटरचा मार्गही पूर्ण केला.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर नावाचं गाव आहे. शेतकरी आणि शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात इथे वस्ती आहे. या गावातील जेष्ठ नागरिक संघाने कै. सूर्यकांतदादा माने यांच्या 77 व्या जयंतीचे औचित्य साधून या आजोबा मंडळींसाठी सायकल स्पर्धा ठेवली होती.
या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी अनेक आजोबा मंडळी सकाळी वेळापूर चौकात दाखल झाले होते. अगदी 60 वर्षांपासून थेट 75 ओलांडलेल्या मंडळींचा उत्साह देखील वाखाणण्यासारखा होता. वेळापूर चौक ते नागठाणा आणि तेथून परत वेळापूर चौकात पोहोचायचे होते. स्पर्धेचा झेंडा फडकतच स्पर्धेला सुरुवात झाली.
या आजोबा मंडळींना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी आयोजक दुचाकीवरून नियोजन करीत होते. मात्र, स्पर्धा रंगात आल्यावर या आजोबा मंडळींच्या सायकलींनी असा वेग घेतला की, दुचाकीवाल्यांनाही त्यांच्या सोबत चालवणे अवघड बनू लागले होते.
अखेर या स्पर्धेत दिलीप पताळे यांनी पहिला नंबर पटकावला. मात्र संपूर्ण स्पर्धेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, ते 75 वर्षीय विलास मिसाळ यांनी. या वयातही त्यांच्या सायकलींचा भन्नाट वेग तरुणांनाही लाजवणारा होता.
पहिल्याच स्पर्धेतील या जेष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून आता या आजोबा मंडळींसाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे आयोजक अमरसिंह माने यांनी सांगितले.