विरार : कुटुंबीयांच्या जाचाला कंटाळून 73 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना विरारमध्ये घडली. मुलगा, सून यांना दिलेले सात लाख रुपये परत करत नाहीत, त्याचसोबत मानसिक छळ करत आहेत, असं सुसाईड नोटमधून समोर आले आहे.
विरारमधील टोटळे तलावावरील स्कायवॉकवरुन तलावात उडी मारुन वृद्धाने आत्महत्या केली. सुसाईड नोटच्या आधारे मुलगा, सून आणि इतर चान नातेवाईकांविरोधात विरार पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण काय आहे?
बाबूनानजी गोहील असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचं नाव आहे. तर अशोक भरत गोहील, सोनी गोहील, सागर गोहील, बच्छुभाई, प्रेमजी वाघल, आणि रुबी सोळंकी अशी गुन्हा दाखल झालेल्या नातेवाईकांची नावे आहेत.
विरार पूर्व भागात वसई-विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या बाजूच्या टोटळे तलावावरील स्कायवॉक वरुन रविवारी या वृद्धाने उडी मारुन आत्महात्या केली. या तलावाच्या बाजूलाच विरार पोलिस ठाणे आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन, तात्काळ वृद्धाला बाहेर काढलं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
गुजराती भाषेत सुसाईड नोट
मृतदेहाची झाडाझडती घेतली असता त्यांच्या खिशात गुजराती भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिले होते की, “मुलगा, सून यांना सात लाख रुपये दिले आहेत. ते मागितले तर परतही करीत नाहीत आणि मानसिक त्रासही देतात. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.”
सुसाईड नोटवरुन विरार पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मुलगा, सून आणि इतर चार नातेवाईक अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.