दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवन इथे संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. निमित्त यूपीच्या विजयाचं असलं तरी राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार आहे. त्यामुळे 'मातोश्री'ची परंपरा खंडीत होणार आहे. कारण राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शिवसेनेचं समर्थन मागण्यासाठी आतापर्यंत सर्व पक्ष 'मातोश्री'वर यायचे, पण शिवसेना पहिल्यांदाच राष्ट्रपती निवडणुकीबाबत दिल्लीत चर्चा करणार आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा इतिहास
2002 साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार टी. एन. शेषन यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तर एनडीएचे उमेदवार अब्दुल कलाम आझाद होते. शेषन यांना पाठिंबा देण्यामागे बाळासाहेबांची भूमिका होती की आचारसंहिता हा फक्त कागदावरचा नियम प्रत्यक्षात अंमलात आणणारा निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन होता. त्यामुळे देशाला शिस्त लावणाऱ्या व्यक्तीला शिवसेना पाठींबा देईल. त्यावेळेस टी. एन. शेषन यांना फक्त शिवसेनेची मतं पडली होती.
2007 साली UPA चे उमेदवार प्रतिभा पाटील यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. त्यावेळेस महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होणार होतं म्हणून देशाच्या सर्वोच्च पदी मराठी भाषिक आणि त्याहून महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून एक महिला निवडून येणं हा महाराष्ट्राचा बहुमान असल्याचं मत बाळासाहेबांनी व्यक्त केलं होतं. एनडीएचे उमेदवार भैरव सिंह शेखावत यांनी स्वतः फोन करुन बाळासाहेबांना पाठींबा देण्याची विनंती केली होती. लालकृष्ण अडवाणींपासून ते मुरली मनोहर जोशी अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून बाळासाहेबांचं मन वळवण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र बाळासाहेब आपल्या भमिकेवर ठाम राहिले.
2012 साली शिवसेनेने पुन्हा UPA चे उमेदवार प्रणव मुखर्जींना पाठींबा दिला होता. शरद पवार आणि प्रणब मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांकडे पाठिंबा मागितला होता. शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन पी. ए. संगमा राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पी. ए. संगमा यांना एनडीएने पाठिंबा दिला होता. मात्र प्रणब बाबू असं संबोधनाऱ्या प्रणब मुखर्जी यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध आणि राजकारणताला प्रदीर्घ अनुभव या निकाशांवर बाळासाहेबांनी प्रणव मुखर्जींना पाठींबा दिला होता.
सद्य राजकीय परिस्थिती
सलग तीनदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं एनडीए विरोधी भूमिका घेतली होती. यंदाच्या राष्ट्रपती निवडणुकीतही शिवसेना महत्वाची भूमिका बजावणार आहे. उद्या दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीचा मुद्दा केंद्रबिंदू असणार आहे. मात्र गेल्या चार वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. उद्या पहिल्यांदाच शिवसेनेचं पक्ष नेतृत्व या बैठकीला हजेरी लावणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पूर्वी युतीचा काडीमोड झाला आणि शिवसेना भाजपने एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक केली. इतकंच काय तर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीवर बोट ठेवलं आणि वांद्र्याचे माफिया म्हणून हिणवलं. पण राज्यतील निवडणुकांपाठोपाठ यूपीचा निकाल लागला आणि चित्र पालटलं.
एनडीएच्या बैठकीला स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपास्थित राहणार असले तरी राष्ट्रपती निवडणुकीला एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र सद्यस्थिती पाहता उद्धव ठाकरे ती किती प्रतिष्ठेची करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.