सकाळी 11 च्या दरम्यान 10 वॅगन म्हणजेच 5 लाख लिटर पाणी भरुन एक्स्प्रेस लातूरच्या दिशेने रवाना झाली. ही रेल्वे आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लातूरमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.
यानंतर लातूरला पाणी देण्याचं काम युद्धपातळीवर सुरुच राहणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर पुन्हा 10 वॅगनमध्ये पाणी भरण्यासाठी सुरुवात होणार आहे.
दरम्यान, कालची सकाळ ही लातुरकरांसाठी नव्या सूर्योदयासह एक नवी उमेद घेऊन आली. कारण, गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा काल संपुष्टात आली. पाण्याची मिरज - लातुर एक्सप्रेस काल सकाळी लातुरात दाखल झाली.
यंदा चांगला पाऊस
गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या पावसाची आस धरुन बसलेल्या जनतेला भारतीय हवामान विभागाने मोठा दिलासा दिला आहे. कारण यंदा पाऊसमान हे उत्तम म्हणजेच सरासरीच्या तब्बल 106 % असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
इतकंच नाही तर विदर्भ आणि दुष्काळी मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परवाच खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही देशभरात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास सारखाच आहे.