सोलापूर :  सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली आहे. शोभा बनशेट्टी यांच्या रुपाने सोलापूरचं महापौरपद एकाच घरात दुसऱ्यांदा जाण्याची ही दुसरी वेळ आहे. बनशेट्टी यांच्या आजेसासऱ्यांनीही सोलापूरचं महापौरपद भूषवलं होतं.


महापौर शोभा बनशेट्टी यांचे आजेसासरे विश्वनाथ बनशेट्टी हे 1971 मध्ये तत्कालीन प्रभाग आठमधूनच निवडून येऊन महापौर झाले होते. आता तब्बल 46 वर्षानंतर त्यांच्या नातसून शोभा यांनीही आताच्या प्रभाग 8 मधून निवडून येत महापौरपदाचा बहुमान मिळवला आहे.

विश्वनाथ बनशेट्टी यांनी सलग 50 वर्षे नगरसेवकपदी निवडून येत विक्रम केला होता. तर शोभा बनशेट्टी या सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.

बनशेट्टी परिवाराशिवाय चाकोते परिवारातही दोनवेळा सोलापूरचं महापौरपद गेलं होतं. दिवंगत माजी आमदार बाबूराव चाकोते यांनी 1973-74 मध्ये तर त्यांचे पुत्र माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी 1992-93 मध्ये महापौर होण्याचा बहुमान मिळवला होता.

सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी


महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांवर मात करत 28 मतांनी भाजपचा विजय झाला, तर सोलापूरच्या उपमहापौरपदी भाजपच्या शशिकला बत्तुल यांची निवड झाली आहे.

102 सदस्य असलेल्या सोलापूर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानावेळी भाजपला 49 मतं मिळाली. शिवसेनेला 21, तर काँग्रेसला 18 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं.