नागपूर ते इटारसीपर्यंतच्या ट्रेनमध्ये आज लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट, गार्ड, टीटी, केबिन मॅनेजर, स्टेशन मॅनेजर अशा सगळ्या जबाबदाऱ्या महिलांनी पार पाडल्या होत्या. एक संपूर्ण ट्रेन महिलांच्या हातात सोपवून रेल्वेने महिलांना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची एकहाती संधी दिली.
आजवर मालगाडी चालवणाऱ्या किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये सहायक भूमिकेत असलेल्या महिलांना संपूर्ण ट्रेन चालवण्याची जबाबदारी मिळाल्यामुळे महिला दिनाचा आनंद द्विगुणित झाला होता.
सावित्री बाई फुले यांच्यापासून आजवरचा प्रवास खडतर होता.मात्र, आता महिला सर्वच क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात वेगळे महिला दिन साजरे करण्याची गरजच उरणार नाही, असं मत यावेळी महिला रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.
तसं पाहिलं तर रेल्वेत हजारो महिला कर्मचारी वेगवेगळ्या भूमिका बजावत आहेत. दिलेल्या जबाबदारीला पूर्ण करत त्या हजारो महिला रोजच त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतात. मात्र, एक संपूर्ण ट्रेन महिलांच्या हातात सोपवून रेल्वेने महिलांना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची एकहाती संधी दिली. त्यामुळे रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांनी महिला दिन हटके पद्धतीने साजरा केला.