मुंबई : राज्यात दुसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाच्या गाड्या रोखणं सुरु ठेवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाली गावात दुधाचा टँकर फोडण्यात आला.  ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टँकरमधून पाणी सोडलं जातं, त्याप्रमाणे इथल्या टँकरमधून दूध सोडलं गेलं. तब्बल 20 हजार लीटर क्षमतेचा हा टँकर होता. टँकर फोडल्यानंतर गावातल्या लोकांनी एकच गर्दी केली आणि हंडे-कळश्यांमधून दूध घरी नेलं.

LIVE UPDATE :


- अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजर ट्रेनने गुजरातहून मुंबईकडे दूध रवाना, केळवे रोड स्थानकातून दुपारी एक वाजता ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली.

दुसऱ्या दिवशीही राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाच्या गाड्या रोखणं सुरु ठेवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाली गावात दुधाचा टँकर फोडण्यात आला.  ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टँकरमधून पाणी सोडलं जातं, त्याप्रमाणे इथल्या टँकरमधून दूध सोडलं गेलं. तब्बल 20 हजार लीटर क्षमतेचा हा टँकर होता. टँकर फोडल्यानंतर गावातल्या लोकांनी एकच गर्दी केली आणि हंडे-कळश्यांमधून दूध घरी नेलं.

तिकडे जालन्याच्या पासोडी शिंदी गावात दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यांवर सांडण्यात आलं. जाफराबादवरुन बुलडाण्याच्या दिशेने दुधाच्या गाड्या जात होत्या. तर सांगलीतल्या कडेगावमधल्या आसदमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा अभिषेक घालून निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर दूध उत्पादकांनी एकत्र येऊन रस्त्यावर दूध ओतून दिलं.

दिल्लीत दुधासंदर्भात बैठक

नवी दिल्लीत दुधासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयात आज दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी कृषीमंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री सुरेश प्रभू आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत. केंद्र पातळीवर महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

कोल्हापुरात गोकुळ, वारणाचं दूध संकलन सुरु

कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे इथं आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दूध घालण्यासाठी आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना थांबवून त्यांना समज देण्यात आली. गोकुळ आणि वारणा दूध संघानं दूध संकलन  करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

पुण्यातील दूधसाठा संपण्याच्या मार्गावर



दूध बंद आंदोलनाचा आता पुण्यात परिणाम होताना दिसत आहे. पुण्यात दुपारपर्यंत दूध साठा संपण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून चितळेंचे दूध संकलन बंद आहे. त्यामुळे पुण्यात उद्यापासून चितळेंचे दूध मिळणार नाही. शिवाय पुण्याकडे येणारी दूधाची वाहने  ठिकठिकाणी अडवली जात आहेत. त्यामुळे आज संध्याकाळनंतर पुण्यात दूध मिळेल का, याबाबत अस्पष्टता आहे.

मुंबईत दुधाचा पुरवठा सुरळीत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि इतर शहरांचा दूध पुरवठा रोखून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हा स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा मुख्य हेतू होता. मात्र स्वाभिमानीच्या आंदोलनाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. कारण मुंबईचा दूध पुरवठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही सुरळीत सुरु आहे.

मुंबईला दुधाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई पोलीस रात्री स्वतः रस्त्यावर उतरले होते. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सपासून प्रत्येक दुकानापर्यंत दुधाच्या गाड्यांना संरक्षण दिले जात होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक दुधाच्या गाडीसोबत एक पोलीस गाडी फिरत होती. मुंबईत येणारे दूध मुंबई बाहेरुन येत असते. त्याच पार्श्वभूमीवर हे संरक्षण दिले गेले.

राजू शेट्टी पालघरमध्ये


इकडे गुजरातहून मुंबईला येणार दूध पुरवठा रोखण्यासाठी राजू शेट्टी पालघरमध्ये दाखल झाले आहेत. गुजरातकडून मुंबईकडे जाणारे दूध टँकर दापचरीला अडवण्यात आले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. कालच पोलिस बंदोबस्तात गुजरातहून मुंबईत दुधाचे ट्रक सोडण्यात आले होते, मात्र आता राजू शेट्टी याठिकाणी दाखल झाले आहेत.

दुधावर कर लावा : निलम गोऱ्हे

बाहेरील राज्यातून येणाऱ्या दुधावर प्रतिलिटर तीन रुपये कर लावावा, जेणेकरुन परराज्यातून येणाऱ्या दुधावर चाप लागेल, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली.



नेमक्या मागण्या काय?

- दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.

- पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.

- या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.