दरम्यान शुक्रवारी नवी मुंबई क्राईम ब्रांचने अभय कुरुंदकर भाईंदरजवळच्या ज्या मुकुंद प्लाझा या इमारतीत राहात होते, तेथे फॉरेन्सिक इन्वेस्टिगेशन टीमसोबत सर्च ऑपरेशन केलं होतं. यावेळी कुरुंदकराच्या घरातून पोलिसांनी एक फ्रिज जप्त केला होता. तसंच फ्रीजखालील थर्माकॉलही जप्त केला होता. सर्च ऑपरेशनवेळी आणखी काही सामानही पोलिसांनी जप्त केलं होतं.
नवी मुंबई क्राईम ब्रांचने चौथा आरोपी महेश पळणीकराला अटक केल्यानंतर अनेक महत्तवपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. बिद्रे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रिदे यांच धड लोखंडी पेटीत टाकून ते याच वसईच्या खाडीत फेकल्याची माहिती ही पोलिसांना मिळाली आहे.
त्यामुळे आज दिवसभर संपूर्ण खाडी परिसरात सर्चिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. यावेळी आरोपी महेश पळणीकरलाही घटनास्थळी आणण्यात आलं होतं.
दरम्यान अश्विनी बिद्रेंचे अवशेष असलेली लोखंडी पेटी या खाडीत फेकून जवळपास दीड वर्ष उलटून गेलं आहे. त्यामुळे ती पेटी शोधण्यासाठी आता अडचणी येणार आहेत. पेटी शोधण्यासाठी क्राईम ब्रांचने मास्टरप्लान बनवला आहे. आजच्या तपास मोहीमेत पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही. त्यामुळे पुन्हा ही तपास मोहीम राबवली जाणार आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला. या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.
पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.
अश्विनी आणि अभय यांच्यात वाद
अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.
अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर हे तात्काळ रजेवर गेले.