Maharashtra News :  गेल्या अडीच वर्षांपासून आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत असताना आता राज्यात स्क्रब टायफस (Scrub Typhus) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने शिरकाव केल्याने आरोग्य विभाग आता हाय अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत आहे.  स्क्रब टायफस राज्यासाठी अत्यंत दुर्मिळ असा आजार असून या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात तर आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळतात. 


मात्र आता महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यातल्या त्यात एकट्या खामगाव तालुक्यात सात रुग्ण आढळून आल्याने आता आरोग्य प्रशासनाची यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलं आहे. खामगाव तालुक्यातील स्क्रब टायफस चा एक रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.


स्क्रब टायफस म्हणजे काय ?


स्क्रब टायफस हा आजार खरं तर आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ असा आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील "ओरिएंशिया सुसूगामुशी" नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण 30 टक्के असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचं म्हटलं जातं. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास 8 ते 10 दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षण दिसून येतात. अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होऊन मरण पावतात त्यामुळे हा आजार होऊ किंवा पसरू नये म्हणून आता यंत्रणा कामाला लागली आहे.


या आजाराचं निदान आणि उपचार शक्यतो शासकीय रुग्णालयात करणे आवश्यक असून यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाणार आहे. 


अशी घ्यावी काळजी 


माईट (कीटक) नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा
झाडाझुडपात काम करताना पूर्ण बाह्याचे कपडे, हातमोजे, गमबूट वापरावेत
खुल्या जागी शौचाला जाणे टाळावे
झाडाझुडपात काम करुन आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत
स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आलेल्या घराच्या जवळील छोटी मोठी खुरटी झाडं झुडपं काढून टाकावीत
संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. 
मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. 
या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे. 
स्क्रब टायफस या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही. केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव बचावाचा मार्ग आहे. 
त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे.