मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.


शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोना महामारीच्या संकटात विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.


मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार!


मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले तरी मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कसं सुरु करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे.


पाहा व्हिडीओ : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार!



मुंबई महानगरपालिकेने शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, 'शाळा सुरु करण्याचा निर्णय मी स्थानिक प्रशासनावर सोडला होता. त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्तांसोबत सकाळी माझी चर्चा झाली आणि मग हा निर्णय घेण्यात आला. अजूनही माझ्या बैठका चर्चा सुरु आहेत. ज्या ठिकणी तयारी झाली त्या ठिकाणी शाळा 23 नोव्हेंबरला सुरु कराव्यात. तसेच, ज्या ठिकाणी तयारी झालेली नाही, त्या ठिकणी स्थानिक प्रशासन परिस्थिती पाहून निर्णय घेईल. आता नाशिकमध्ये शाळा सुरु करणार आहे. पुण्यातही माझी चर्चा सुरु आहे.'


'पालकांची संमतीसुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे त्यांचासुद्धा विचार यामध्ये घेण्यात येणार आहे. मुंबई सोडून सर्व ठिकाणी शाळा या 23 नोव्हेंबरला सुरु होत आहेत. कारण ऑनलाइन माध्यमातून शिक्षण सर्वांना मिळत नाहीये, त्यामुळे शाळा सुरु करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर स्थानिक प्रशासनाला वाटत असेल शाळा सुरु करणं आता शक्य नाही ते पुढे ढकलावं तर ते अधिकार त्यांना देण्यात आलेल्या गाईडलाइन्समध्ये नमूद करण्यात आले आहेत.' , असंही वर्षा गायकवाड यांनी बोलताना सांगितलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mumbai Schools Reopen Postponed | मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार!