नागपूर : उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील राज्य बोर्डाच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. दुपारच्या सत्रातील शाळा आता सकाळी भरवण्यात येणार आहेत. उद्यापासून तत्काळ या निर्णयाची अंमलबवणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. शनिवारी दुपारी नागपूरचं तापमान 42.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. या तापमानवाढीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यास फटका बसू नये, यासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच येत्या शैक्षणिक वर्षात विदर्भ वगळता राज्यातील इतर शाळा 15 जूनला सुरु होणार आहेत. तर विदर्भातील शाळा मात्र २७ जूनला सुरू होणार आहेत. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शाळा उशिराने सुरू होणार असल्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाने जाहीर केलं आहे.