Beed News Update : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील देवस्थान आणि दर्ग्याच्या जमिनी बळकावल्या प्रकरणी आष्टीचे नायब तहसीलदार प्रदिप पांडूळे आणि मंडळ अधिकारी शिवप्रसाद सिंघनवाड यांना अटक केली आहे. अप्पर पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी आज पहाटे ही कारवाई केली. दरम्यान, यापूर्वीही या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे.   


आष्टी मधील धार्मिक स्थळाच्या जमिनी राजकीय नेत्यांनी बळकावल्या असल्याची टीका गेल्या महिन्यात झालेल्या नगरपंचायती निवडणुकीमध्ये झाली होती.  यात आष्टीचे आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावरही जमीन बळकावल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी  टीका केली होती. परंतु, या प्रकरणाशी आणि जमिनीशी आपला काही संबंध नाही असा खुलासा सुरेश धस आणि भिमराव धोंडे यांनी केला होता.


आष्टी तालुक्यातील जामखेड-आष्टी हद्दीवर असलेल्या चिंचपूर या ठिकाणी मदरसाची जवळपास 59 एकर जमीन होती. संगनमत करीत कागदी घोडे रंगवून या जमीन गैरव्यवहार प्रकरणात नरहरी शेळके आणि प्रकाश आघाव पाटील यांनी एका दिवसात 25 जजमेंट देण्याचा पराक्रम केला होता. यात मोठी माया यांनी कमवली असल्याने त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणात आष्टीचे तत्कालीन नायब तहसीलदार प्रदिप पांडूळे आणि मंडळ अधिकारी शिवप्रसाद सिंघनवाड या दोघांना अटक करण्यात आली आहे.


नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे हे आष्टीचे पूत्र 
आष्टीचे तत्कालीन नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे हे आष्टी तालुक्यातील पिंपरी घाट या गावचे रहिवासी आहेत. या तालुक्यातीलच रहिवासी असल्याने पांडुळे यांचे संबंध जवळपास सर्व क्षेत्रातील लोकांशी होते आणि त्याच ओळखीवर प्रदीप पांडुळे हे आठ वर्ष आष्टी तहसीलमध्ये कार्यरत होते. पांडूळे यांनी आष्टी येथील नायब तहसीलदार म्हणून  2013 साली पदभार स्वीकारला होता. त्यानंतर ते 2021 पर्यंत याच ठिकाणी कार्यरत होते. या आठ वर्षात काही काळ तहसीलदार पदाचा प्रभारी चार्जही पांडुळे यांच्याकडे होता. 


चिंचपूरच्या प्रकरणात 15 जणांवर गुन्हा दाखल
आष्टी तालुक्यातील सहा धार्मिक स्थळांच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री झाल्याचे यापूर्वीच पुढे आले आहे. यातच चिंचपूर येथील मदरसाच्या 59 एकरच्या घोट्याळ्यात जवळपास 15 जणांवर गून्हा दाखल झाला आहे. इरशान नवाब खान, अस्लम नवाब खान (रा. दोघेही आष्टी), रहेमान उर्फ रहिम हुसेन शेख, रज्जाक हुसेन शेख, बाहदुरखा अब्बासखा पठाण, शेरखा अब्बास खा पठाण,(सर्व रा. चिंचपूर), एकबाल अहमद खा,आयुब खा, अहमद खा पठाण, रूकसाना सय्यद सुलतान (सर्व रा. तपनेश्वर गल्ली जामखेड), जाकीर बहादूर पठाण, जमीर बहादूर खा पठाण, अस्लम शेरखा पठाण, परवीन जमीर खा पठाण (रा.सर्व चिंचपूर), प्रकाश आघाव पाटील (रा. बीड ) आणि एन. आर. शेळके (रा. बीड) यांच्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे.


बीड जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या जमिनी विक्री करण्याच्या गोरख व्यवसायास निलंबित उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याने मोठा हातभार लावला होता. याच्या सोबतच एन. आर शेळके यांनी बेकायदेशीर जमीन विक्री करण्यासाठी या आरोपींना सहकार्य केले होते, असा आरोप त्यांच्यावर आहे.