मुंबई : राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयं आजपासून सुरु झाली आहेत.  नववी आणि बारावीच्या वर्गांना आजपासून सुरुवात झाली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये शाळा सुरु होणार नाहीत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि अमरावतीमधील शाळा आजपासून सुरु होत आहेत. दरम्यान शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अनेक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक संघटनांकडून शाळा सुरु करु नये अशी मागणी करण्यात येत आहे. तरी शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.


पुण्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु
राज्य सरकारने शाळा उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आजपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शाळांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेज या शाळेतही जय्यत तयारी करण्यात आली आहे.. शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स मेन्टेन करण्यासाठी बेंचवर विद्यार्थ्यांचे नाव टाकण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी एका दिवशी मुले तर एका दिवशी मुली येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षकांचीही covid-19 ची चाचणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्व शिक्षक हे निगेटिव्ह आहेत. एकंदरीत या विद्यालयात लॉकडाऊननंतरची शाळा उघडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.


औरंगाबादच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु होण्याची शक्यता कमी
औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या सगळ्याच शाळा आज सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. कारण 17 टक्के शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा आजपासून सुरु होण्याची शक्यता नाही. गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. अनेक शाळेतील शिक्षकांचे अद्यापही रिपोर्ट आले नसल्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकानी विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत शाळेत बोलवले नाही.



सोलापूरमधील 1087 शाळा सुरु होणार
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1087 शाळा आज सुरु होत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने जोरदार तयारी केली आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने 14 हजारांपेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गात 20 विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर शाळांचे सॅनिटायजेशन करुन पूर्ण झालं आहे. जवळपास 8 महिन्यापासून शाळा बंद होत्या. आज नववी ते बारावीचे विद्यार्थी शाळेत येणार आहेत.


नाशिकमधील शाळा 4 जानेवारी 2021 पर्यंत बंद राहणार
नाशिकमधिल शाळा आता नवीन वर्षातच सुरु होणार आहेत. दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत दिसून येणारी वाढ लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा 4 जानेवारी 2021 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच कुठलेही योग्य नियोजन नसल्याने शाळा सुरु करण्यास नाशिकमधील अनेक पालक आणि शिक्षकांचा विरोध होता आणि हिच सर्व परिस्थिती बघता जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वांचं म्हणणं ऐकून घेत 4 जानेवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापूर्वी पुन्हा एकदा सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.