मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर देशात आतापर्यंत 11 अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी 26 अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

भारतात 132 अब्जाधीश

हुरन ग्लोबल रिच लिस्ट इंडियाच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. भारतात 132 अब्जाधीश आहेत, ज्यांची संपत्ती प्रत्येकी एक अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक आहे. भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 392 अब्ज डॉलर एवढी आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

नोटाबंदीनंतर देशात अब्जाधीशांची संख्या घटली असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पहिल्या 10 अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांच्यानंतर 14 अब्ज डॉलर संपत्तीसह एसपी हिंदुजा आणि परिवार दुसऱ्या आणि एवढ्याच संपत्तीसह दिलीप सांघवी तिसऱ्या स्थानावर आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक 51 अब्जाधीश

नोटाबंदीनंतर देशात 11 अब्जाधीश कमी झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मुंबईत 42, दिल्लीत 21 आणि अहमदाबादमध्ये 9 अब्जाधीश आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात एकूण 51 अब्जाधीश आहेत.