कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर कोल्हापूरमध्ये गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मराठा समाज हा प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये विखुरला आहे. त्या मराठा समाजाने राजकीयदृष्ट्या देखील एकत्र यावे अशी इच्छा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी त्या बैठकीमध्ये बोलून दाखवली आहे.
"आजच्या घडीला आपला मराठा समाज विखुरलेला आहे. थोडे काँग्रेसमध्ये, थोडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, थोडे शिवसेनेत आणि थोडे भाजपमध्ये देखील आहेत. मराठ्यांनी आपले नेतृत्त्व सिद्ध केलं पाहिजे. मराठा हा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. आपल्या सगळ्या बंधूंवर आपलं लक्ष पाहिजे, कुणावर अन्याय होता कामा नये. मात्र असं असताना आपल्यावर देखील अन्याय करुन घेऊ नये हे देखील पाहा. आरामात बसून आपल्याला काहीही मिळणार नाही. आपापल्यात वाद होतील अशी वक्तव्य कुणी करु नका," असंही शाहू महाराज म्हणाले.
मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टातील लढाई आपण जिंकलीच पाहिजे. केवळ राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने देखील जबाबदारी घेतली पाहिजे. केंद्र सरकारला मराठ्यांच्या बाजूने लढायचं असेल तर मागे राहून चालणार नाही. तशी त्यांची इच्छा आहे का हे देखील पाहावं लागेल. तारखा लवकरात लवकर घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. नाहीतर आपल्याला असेच झिजवत बसतील, असंही श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.
आपली ताकद आपल्यासाठी वापरा : शाहू महाराज
मराठा समाजात ताकद आहे. मात्र ती ताकद आपण आपल्यासाठी वापरत नाही. शेती हे आपलं मूळ आहे. शेतीमध्ये प्रगती करा, बारामतीसारखी शेती कशी करता येईल याचा विचार करा. आपण कधी एकत्र येत नाहीत, पण आज एकत्र येण्याचा विचार मांडलात यात मी समाधानी असल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी बोलून दाखवले.
Maratha Reservation | मराठा समाजासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे : नरेंद्र पाटील