धुळे:  बीएसएनएलच्या महाराष्ट्रातील साधारण 250 ते 300 ठेकेदारांचे गेल्या 18 महिन्यांपासून बिलांचे पैसे थकल्याने ठेकेदारांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बिलं थकल्याने बँका, खाजगी सावकार यांच्याकडून घेतलेल्या कर्ज व त्यावरील व्याज भरण्यासाठी तगादा लावत आहेत. त्यातच कामगार, मुकादम देखील मजुरांना पैसे द्या नाहीतर केबल तोडून टाकू अशा धमक्या देत असल्याचं महाराष्ट्र टेलिकॉम असोसिएशनचे सचिव अनिल शिरसाठ यांनी धुळ्यात सांगितलं आहे. धुळ्यात त्यांच्या उपस्थितीत बीएसएनलच्या महाप्रबंधक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. तसेच महाप्रबंधकांना मागण्यांचे निवेदन सादर केलं. थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यास कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा ठेकेदारांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी असलेला ग्रामपंचायत जोडो अभियान या अंतर्गत बीएसएनएलने ठेकेदारांच्या माध्यमातून प्रत्येक खेडोपाडी-गावोगावी ऑप्टिकल फायबर पोहचवण्याचं कामं केलीत. मात्र या कामांचे देखील बिलं न मिळाल्यानं कामगार, मुकादम कामगारांना पैसे द्यायचे असल्यानं दररोज ठेकेदारांकडे तगादा लावत आहे. पैसे मिळाले नाहीत तर ऑप्टिकल फायबर तोडून टाकण्याची धमकी या लोकांकडून येत असल्याचं संघटनेचे सचिव अनिल शिरसाठ यांनी सांगितलं. शिवाय ठेकेदारांनी बँका, खाजगी सावकार यांच्याकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज थकल्याने त्यासाठी ठेकेदारांकडे तगादा सुरु आहे. 18 महिन्यांपासून बीएसएनएलने महाराष्ट्रातील साधारण 250 ते 300 ठेकेदारांचे 700 ते 800 कोटी रुपये थकवल्याचं ठेकेदारांचे म्हणणे आहे.

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांनी याप्रकरणी लक्ष घालून ठेकेदारांना दसऱ्यापूर्वी न्याय द्यावा, अन्यथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या बीएसएनएलच्या महाप्रबंधक कार्यालसमोर कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. सोमवारी बीएसएनएलचे सर्व ठेकेदार मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचं अनिल शिरसाठ यांनी सांगितलं.