पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 114 वा पदवीदान समारंभ आज पार पडला. मात्र या पदवीदान समारंभावर पगड्यांच्या वादाचं सावट होतं. पारंपारिक पोषाखावर पुणेरी पगडी घालण्यास काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्याने वाद रंगला होता.


पदक आणि पुरस्कार मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ब्रिटिश पद्धतीच्या गाऊन ऐवजी कुर्ता-पायजमा हा पारंपरिक पोषाख द्यायचा निर्णय घेतला होता. त्यासोबत पुणेरी पगडी घालण्यासही विद्यापीठाने सांगितलं. मात्र त्याला काही विद्यार्थी संघटनांकडून विरोध सुरु झाला.

अखेर, विद्यार्थ्यांना पुणेरी पगडी घालण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. तरीही काही विद्यार्थी संघटनांनी पदवीदान समारंभ सुरु होताच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांना मंडपातून दूर करत पोलिस स्टेशनमध्ये नेलं. त्यानंतर पदवीदान समारंभ सुरु झाला.

पुणेरी पगडी, पारंपरिक पोषाख, पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

या समारंभात पदक आणि पुरस्कार मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगात कुर्ता-पायजमा हा पारंपरिक पोषाख होता. मात्र डोक्यावर ब्रिटिश पद्धतीची गोल टोपी होती. पुरस्कार देणाऱ्या स्टेजवरील कुलगुरु आणि इतर मान्यवरांनी मात्र कुर्ता पायजमा यासह डोक्यावर पुणेरी पगडीही परिधान केली होती.