यवतमाळ : मोठ्या वादानंतर आजपासून यवतमाळमध्ये ( शुक्रवार ) 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. वैशाली सुधाकर येडे यांना संमेलनाच्या उद्घाटकाचा मान मिळणार आहे.


संत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत दुपारी 4 वाजता हे उद्घाटन पार पडणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचं स्वागताध्यक्ष मदन येरावर यांनी सांगितलं. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे भाषण उद्घाटनावेळी वाचावे अशी मागणी होत होती. मात्र सहगल यांचे भाषण वाचलं जाणार नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. साहित्यिक, पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, कवी यांनी बहिष्कार टाकल्यानंतर या कार्यक्रमाचं काय हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

साहित्य मंडळाने घटनेत बदल करुन पहिल्यांदाच निवडणुका न घेता ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची संमेलनाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती. तसेच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाचं उद्घाटक म्हणून आमंत्रण दिल्यानंतर वाद झाला होता. त्यामुळे आमंत्रण रद्द करण्यात आले होते. आयोजकांच्या या निर्णयाचा विरोध करत अनेक मान्यवर मंडळींनी संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला.

विद्या देवधर महामंडळाच्या नवीन अध्यक्षा
नयनतारा सहगल यांच आमंत्रण रद्द केल्यानंतर उद्घाटक म्हणून काही नावं सुचवण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर गुरुवारी साहित्य महामंडाळाची बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा तेलंगणा साहित्य परिषदेच्या अध्यक्षा विद्या देवधर यांच्याकडे सोपवण्यात आली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार उद्घाटन
संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात यावा, अशी मागणी आयोजकांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत महामंडळाने यवतमाळमधील कळंब तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान देण्यात येणार आहे. त्यामुळे अखेर उद्घाटक कोण होणार यावर पडदा पडला आहे.

कोण आहेत वैशाली येडे?
वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले आहेत. तीन एकर शेती आहे. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. एक वर्षापासून नाटक क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे यांनी 'तेरवं' नाटक लिहिले आहे. त्यात यांच्या जीवनाचा संघर्ष होता. त्या नाटकांत त्यांनी भूमिका देखील केली आहे.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस झाली होती
नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून आता तीन नवीन नावं सुचवली होती. प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ या तिघांची नावं यवतमाळ आयोजन समितीनं सुचवली होती. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजन समितीला पत्र पाठवून नवीन उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचं आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून तीन नावं सुचवली. यवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे तसेच उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असं पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवलं होतं.

आयोजकांकडून नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असं साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीच लेखिका नयनतारा सहगल यांना पत्र लिहून कळवलं होतं. संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी सहगल यांना पत्र लिहून आपली असमर्थता दर्शवली. संमेलनाचे उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांच्या नावाला मनसेसह शेतकरी न्याय हक्क समितीने विरोध केला होता. त्यानंतर मनसेने आपली भूमिका बदलली होती.

काय आहे वाद?
या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती.

संबंधित बातम्या

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस

मराठी साहित्य संमलेन अध्यक्षा अरुणा ढेरेंना डॉ. मुणगेकरांचं खुलं पत्र

92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरेंची निवड
नयनतारा सहगल यांच्या अपमानावर विविध मान्यवरांचा संमेलनावर बहिष्कार

मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण

... तर मनसे उधळणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

नयनतारा सहगल यांना विरोध नाही : राज ठाकरे

नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद